दीड वर्षात ४३ रेशन दुकानदारांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:33 AM2019-07-24T00:33:12+5:302019-07-24T00:35:14+5:30

स्वस्त धान्य वाटप करताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४३ दुकानदारांवर महसूल प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.

Action against 3 ration shopkeepers in a year and a half | दीड वर्षात ४३ रेशन दुकानदारांवर कारवाई

दीड वर्षात ४३ रेशन दुकानदारांवर कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : स्वस्त धान्य वाटप करताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४३ दुकानदारांवर महसूल प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. धान्य कमी देणे, पावती न देणे, ई-पॉस मशीनद्वारे धान्याचे वाटप न करणे इ. विविध कारणांवरून गत दीड वर्षात ही कारवाई करण्यात आली. तर यातील आठ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
जालना जिल्ह्यात १२८० स्वस्त धान्य दुकाने आहेत. तर लाभार्थी कुटुंबांची संख्या ३ लाख २८ हजार ८०६ इतकी आहे. जिल्हा पुरवठा विभागाने प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदारास ई-पॉस मशीनचे वाटप केले आहे. प्रत्येक दुकानदारास ई-पॉस मशीनद्वारेच धान्य वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्वस्त धान्य दुकानदारांकडून याची अंमलबजावणी सुरु असली तरी काही स्वस्त धान्य दुकानदारांचे ई-पॉस मशीनद्वारे धान्य वाटप कमी आहे.
ई-पॉसद्वारे धान्य वितरण वाढविण्याच्या अनुषंगाने आवश्यक सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आल्या होत्या. परंतु, तरीही स्वस्त धान्य दुकानदार ई-पॉसद्वारे धान्याचे वाटप करीत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. तसेच लाभार्थ्यांना कमी धान्य देणे, पावती न देणे इ. प्रकारच्या ४२ तक्रारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. या तक्रारांची दखल घेत तहसीलदारांच्या अहवालावरून जिल्हा पुरवठा अधिका-यांनी दोन वर्षात ४३ दुकानदारांवर कारवाई केली आहे.
यात ८ दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तर १५ दुकानदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. १२ जणांचा परवाना पूर्ववत तर ८ जणांना सक्त ताकीद देण्यात आल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी आर. एम. बसैय्ये यांनी सांगितले.
अनेक गावे : दुकानदारांवर कारवाई
जालना तालुक्यातील पाष्टा, हिवर्डी, जालना, मंठा तालुक्यातील लिंबोणी, पांगरा गडदे, पांगरी, दु. क्र. १५, रानमाळा, शिवणगिरी, लावणी, गोसावी पांगरी, अंबड तालुक्यातील हसनापूर, लखमापुरी, देशगव्हाण, भगवानगर, काटखेडा, रुई, किनगाव, डोमेगाव, बदनापूर तालुक्यातील चितोडा, वाल्हा, डावरगाव, बुटेगाव, वाल्हा, रोषणगाव, वरुडी, देवगाव येथील २, भोकरदन तालुक्यातील ईटा, बोरगाव, उमरखेडा, गोंदी, जानेफळ, बोरगाव, शेलूद, जाफराबाद तालुक्यातील कोळेगाव, परतूर तालुक्यातील वाटूरफाटा, कोकाटे हादगाव, आंबा, दहिफळे, घनसावंगी तालुक्यातील पांगरा गावातील दुकानदारांवर गत दोन वर्षात कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Action against 3 ration shopkeepers in a year and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.