२ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ८ कर्मचाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:53 AM2019-07-19T00:53:28+5:302019-07-19T00:54:39+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्रावर अनुपस्थित आढळलेल्या २ वैद्यकीय अधिका-यांसह ८ कर्मचा-यांवर जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी एक दिवसाच्या वेतन कपातीची कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : प्राथमिक आरोग्य केंद्रावर अनुपस्थित आढळलेल्या २ वैद्यकीय अधिका-यांसह ८ कर्मचा-यांवर जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी एक दिवसाच्या वेतन कपातीची कारवाई केली.
ग्रामीण भागातील नागरिकांना स्वस्तदरात उपचार मिळावे, यासाठी जिल्हाभरात ४० आरोग्य केंद्रे व २१० उप आरोग्य केंद्रे कार्यरत आहे. या केंद्रांमार्फत ग्रामस्थांवर उपचार केले जात आहे. परंतु, या केंद्रावरील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मनमानी कारभार करीत आहेत. वरिष्ठ अधिका-यांना न सांगता वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित राहत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिका-यांनी केलेल्या पाहणीत आढळून आले.
जिल्हा आरोग्य अधिकारी खतगावकर यांनी १६ जुलै रोजी शहागड, सुखापुरी, जामखेड, गोंदी, वडीगोंद्री, नालेवाडी येथील आरोग्य केंद्रांची पाहणी केली. या पहाणीत गोंदी येथील वैद्यकीय अधिकारी अविनाश देशमुख व जामखेड येथील वैद्यकीय अधिकारी पवार हे अनुपस्थित होते. तसेच जामखेड येथील आरोग्य केंद्रात दोन कर्मचारी, वडीगोद्री येथील आरोग्य सहायक, नालेवाडी येथील आरोग्य सेवक, शहागड येथील आरोग्य सेवक, सुखापुरी येथील आरोग्य केंद्रात दोन आरोग्य सहायक व एक कर्मचारी अनुपस्थित आढळून आला.
मनमानी कारभारामुळे रुग्णांचे हाल
ग्रामस्थांना स्वस्त दरात उपचार मिळावे, यासाठी शासनाने ग्रामीण भागात आरोग्य केंद्रे सुरु केली आहेत. परंतु, या आरोग्य केंद्रावरील अधिकारी व कर्मचारी मनमानी कारभार करीत आहेत. त्यांच्या या मनमानी कारभारामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.
कारवाईनंतरही कामात कुचराई
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी कामात कुचराई करणा-या अधिकारी व कर्मचा-यांवर कारवाई केली होती. यात आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचा-यांचाही समावेश होता. या कारवाईनंतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांमध्ये सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, सध्या तरी अधिकारी सुधारले नसल्याचे चित्र दिसत आहे.