अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:28 AM2021-01-21T04:28:56+5:302021-01-21T04:28:56+5:30
भोकरदन : तालुक्यातील नांजा, जवखेडा शिवारातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली ...
भोकरदन : तालुक्यातील नांजा, जवखेडा शिवारातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली असून, यावेळी दोन ट्रॅक्टरसह १२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तालुक्यातील पूर्णा, केळणा, गिरीजा आदी नद्यांतून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू आहे. याला लगाम लावण्यासाठी भोकरदन पोलिसांकडून कारवाया करण्यात येत आहेत. मात्र, या कारवायांनाही न जुमानता अवैधरित्या वाळूचोरी करण्यात येत आहे. तालुक्यातील नांजा व जवखेडा शिवारातील पूर्णा नदीमध्ये अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर बुधवारी कारवाई करण्यात आली. जवखेडा ठोबरी शिवारातून रेतीने भरलेले एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. संशयित ट्रॅक्टरचालक सुरेश नारायण काळे (रा.बामखेडा) व मालक कृष्णा कौतिक जाधव (रा. लिंगेवाडी) यांच्याविरूध्द कारवाई करण्यात आली. तसेच नांजा शिवारातून एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. तर रामेश्वर एकनाथ कानडाजे (रा. नांजा ता.भोकरदन) यांच्याविरूद्ध पोउपनि भागवत नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कारवाईतही प्रशासनाकडून दुजाभाव केला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. वाळूसह अवैध गुटखाविक्री व इतर अवैध धंदेही तालुक्यात सुरू आहेत. या अवैध धंद्यांकडे लक्ष देवून पोलीस अधीक्षकांनी कारवाईच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.