कुरण येथे अवैध वाळू तस्करांविरुध्द कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:55 AM2018-11-21T00:55:00+5:302018-11-21T00:55:14+5:30
अंबड तालुक्यातील कुरण येथील गोदापात्रातून अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर नुकतीच कारवाई करत गोंदी पोलिसांनी ट्रॅक्टरसह वीस लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : अंबड तालुक्यातील कुरण येथील गोदापात्रातून अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर नुकतीच कारवाई करत गोंदी पोलिसांनी ट्रॅक्टरसह वीस लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कुरण येथील गोदापात्रात सर्रास वाळू उपसा सुरू होता. मात्र, कारवाई करण्यासाठी पोलीस व महसूलच्या पथकाला नदीपात्रात जाण्याअगोदरच वाळू तस्कर पळ काढत असे. दरम्यान, कुरण गोदापात्रात ट्रॅॅक्टरमध्ये अवैध वाळू भरत असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने कुरण-पाथरवाला रस्त्यावरून अवैध वाळूची वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडले.
दरम्यान पाळत असतानाही पोलीस कोठून आले म्हणून परिसरातील अवैध वाळू तस्कर भांबावून गेले आहेत. तिन्ही ट्रॅक्टर गोंदी पोलीस ठाण्यात लावून पोलिसांनी चालक अशोक राक्षे, बाळू कुरणकर व अन्य एक अशा तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या केलेल्या कारवाईमुळे परिसरातून अवैध वाळू वाहतूक करणा-यांची चांगलीच भंबेरी उडाली असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी ही कारवाई केल्यापासून आजपर्यंत नदीपात्रात एकही वाहन आढळून आले नाही.
ही कारवाई उपनिरीक्षक हनुमंत वारे, ज्ञानेश्वर मराडे, गणेश लक्कस यांच्यासह पोलीस कर्मचा-यांनी केल्याची माहिती गोंदी पोलीसांनी दिली.
अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला
तळणी : मंठा तालुक्यातील टाकळखोपा येथून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करताना टेम्पो महसूल व पोलीस पथकांनी मंगळवारी रात्री मंठा शहरात पकडला.
टाकळखोपा येथील विष्णू लाड यांच्या मालकीचा टेम्पो एम. एच. २१ बी.एच १४२९ हे अवैधरीत्या १ ब्रास वाळूची वाहतूक करताना तलाठी, पोउनि. एम.एस. गटूवार यांना आढळून आले. यानंतर त्यांनी या वाहनावर कारवाई करून टेम्पो मंठा तहसील कार्यालयात जप्त केला आहे.