चढ्या दराने बियाणे विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:21 AM2021-07-02T04:21:02+5:302021-07-02T04:21:02+5:30
परतूर : सोयाबीनच्या बियाणाची चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानावर कृषी विभागाच्या वतीने गुरुवारी कारवाई करण्यात आली ...
परतूर : सोयाबीनच्या बियाणाची चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानावर कृषी विभागाच्या वतीने गुरुवारी कारवाई करण्यात आली आहे.
परतूर शहरातील मोंढा भागात मे. सालासर टेड्रर्स नावाचे कृषी सेवा केंद्र आहे. या केंद्रात चढ्या दराने सोयाबीन बियाणाची विक्री केली जात असल्याची माहिती जिल्हा गुण नियंत्रक निरीक्षक विवेक गायकवाड व तालुका कृषी अधिकारी रुस्तम बोनगे यांना मिळाली. या माहितीवरून डमी ग्राहक पाठवून पडताळणी केली असता, सालासर टेड्रर्स कृषी सेवा केंद्रचालकाने इगल कंपनीच्या सोयाबीनच्या बियाणाची बॅग ३९०० रुपयांची असताना या दुकानदाराने ४ हजार २०० रुपयांना दिल्याचे समोर आले. यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दुकानाचा पंचनामा करून परवाना रद्द करण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठांना पाठविला आहे. या कारवाईनंतर जिल्हा कृषी अधीक्षक बी. आर. शिंदे यांनी परतूर येथे भेट देऊन कृषी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
हा दुकानदार सोयाबीनचे बियाणे चढ्या भावाने विक्री करत असल्याचे आढळून आले. या दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल. इतर कोणीही दुकानदार खते, औषधी व बियाणे चढ्या भावाने विक्री करत असल्यास तत्काळ कळवावे.
बी. आर. शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक.