वाळूतस्करांवर कारवाई; नदीतून दोन ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 12:25 AM2019-07-04T00:25:06+5:302019-07-04T00:25:28+5:30
उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी गोंदी व साष्टपिंपळगाव शिवारात कारवाई करून दोन ट्रॅक्टर जप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : आपेगाव ते कोठाळापर्यंतच्या गोदावरी नदीपात्रातील वाळूचीतस्करी करणाऱ्यांविरूध्द महसूल विभागाने धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी गोंदी व साष्टपिंपळगाव शिवारात कारवाई करून दोन ट्रॅक्टर जप्त केले.
अवैध वाळूतस्करीवर तारांकित प्रश्न झाल्यानंतर प्रशासनाने वाळू तस्करांविरूध्द धडक मोहीमच हाती घेतली आहे. मात्र, तरीही काही वाळू तस्कर आपेगाव ते कोठाळापर्यंतच्या गोदावरी पट्ट्यातून वाळू नेत आहेत. अशा वाळू तस्करांविरूध्द उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी धडक मोहीम सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वी शहागड-गोंदी रस्त्यावर हायवा पकडण्यात आला होता. त्यानंतर गोंदी शिवारात मंगळवारी दुपारी चक्क दुचाकीवरून तस्करांचा पाठलाग करून ट्रॅक्टर जप्त करण्यात आला.
तर साष्टपिंपळगाव परिसरातही कारवाई करून ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला आहे. हे ट्रॅक्टर गोंदी ठाण्याच्या आवारात लावण्यात आले आहेत. पथकाच्या या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.