भरीव निधी मिळाल्याने सिंचनाचा अनुशेष दूर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:21 AM2021-06-24T04:21:11+5:302021-06-24T04:21:11+5:30
जालना : जालना जिल्हा हा सिंचनाच्या दृष्टीने अन्य जिल्ह्यांच्या मानाने खूप मागे आहे. हातवन हा जालना तालुक्यातील मोठा प्रकल्प ...
जालना : जालना जिल्हा हा सिंचनाच्या दृष्टीने अन्य जिल्ह्यांच्या मानाने खूप मागे आहे. हातवन हा जालना तालुक्यातील मोठा प्रकल्प आहे. यासाठी २९७ कोटी रुपये मंजूर झाल्याचे कळल्यावर हातवनसह परिसरात आंनदोत्सव साजरा करण्यात आला.
निम्न दुधना प्रकल्पानंतर हा जालना जिल्ह्यातील अत्यंत मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. २००८ मध्ये या प्रकल्पास मंजुरी मिळाली होती. त्यावेळी या प्रकल्पाची मूळ किंमत ५७ कोटी रुपये एवढी होती. हा प्रकल्प लांबणीवर पडत गेल्याने किंमत वाढली आहे. या प्रकल्पामुळे हातवन, खणेपुरी, भाटेपुरी, कारला, यासह अन्य पंधरा ते वीस गावांना लाभ होणार आहे. हा प्रकल्प दुधना नदीवर होणार आहे. प्रकल्प मंजुरीसाठी गावकऱ्यांनी आधी नकार दर्शविला होता; परंतु अनेक नेत्यांनी मध्यस्थी करून याचे महत्त्व पटवून दिले.
एकूणच हातवण प्रकल्पासाठी येथील नागरिकांनी २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता; परंतु आज हा निधी मिळणार असल्याचे माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केल्याची माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रीकांत घुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आता या प्रकल्पाचे तातडीने काम सुरू होणे गरजचेे असल्याचे घुले म्हणाले.
केंद्र सरकारकडे केला होता पाठपुरावा
हातवन येथील हा सिंचन प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी ज्याप्रमाणे पालकमंत्री राजेश टोपे यांनी प्रयत्न केले, त्याचप्रमाणे आपणही या प्रकल्पाचे महत्त्व फार आधीपासून ओळखले होते. त्यामुळे केंद्र सरकारच्या जल आयोगाकडून प्रकल्पास मंजुरी मिळावी म्हणून आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. त्याचप्रमाणे वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांकडे निधीसाठी पाठपुरावा केला. शेतकऱ्यांचे प्रकल्प होण्यासाठी मन वळविले. आज हा २९७ कोटींचा निधी मिळाल्याने मनस्वी समाधान मिळत आहे.
- अर्जुन खोतकर, माजी मंत्री