शेतकरी कर्जमुक्तीचेच ध्येय- आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:44 AM2019-09-01T00:44:06+5:302019-09-01T00:44:44+5:30

शेतकरी हा गुन्हेगार नसून तो अन्नदाता असल्याचे प्रतिपादन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

Aditya Thackeray aims to get rid of peasant debt | शेतकरी कर्जमुक्तीचेच ध्येय- आदित्य ठाकरे

शेतकरी कर्जमुक्तीचेच ध्येय- आदित्य ठाकरे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्याला जोपर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती आम्ही देत नाही, तोपर्यंत तो समाधानी होणार नाही. त्यामुळे आमचे आगामी ध्येय हे कर्जमाफी नसून सरसकट कर्जमुक्ती हे आहे. माफी तर गुन्हेगाराला केली जाते. शेतकरी हा गुन्हेगार नसून तो अन्नदाता असल्याचे प्रतिपादन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा शनिवारी जालन्यात आली होती. यावेळी त्यांनी जुन्या मोंढ्यात आयोजित शेतकऱ्यांशी संवाद साधला. प्रारंभी रेशीम विभागाच्या वतीने आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन केले. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांपासून आपण संपूर्ण महाराष्ट्रात जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने फिरून शेतकरी, नागरिकांचे प्रश्न जाणून घेत आहोत. तसेच लोकसभेमध्ये त्यांनी युतीला जी भरभरून साथ दिली त्याबद्दल आभार मानत आहोत. दौ-याच्या निमित्ताने जनतेच्या कोणत्या अडीअडचणी आहेत, हे समजून येत आहे. आमच्यावर जनतेचा विश्वास आणि प्रेम असल्याने आमची जबाबदारी वाढली आहे. शिवसेनेकडे येणा-याला निश्चित दिलासा मिळतो, असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही यात्रा नसून निवडणुकीमध्ये तुम्ही युतीला साथ देणारच यात शंका नाही. निवडणुका येतात आणि जातात त्यात हार आणि जीत हेही ठरलेले असते. आम्ही जिंकलो तरी तरी तुमच्या सोबत राहू आणि हरलो तरी तुमच्या सोबत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. सरकारमध्ये असो किंवा नसो; कर्जमुक्ती हे आमचे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. जनता जनार्दन हाच आमचा देव असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. जनआशीर्वाद यात्रा म्हणजेच खºया अर्थाने लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठीची ही तीर्थयात्रा असल्याचा उल्लेखही ठाकरे यांनी केला.
कार्यक्रमास माजी खा. चंद्रकांत खैरे, आ. अंबादास दानवे, शिवसेना नेते विनोद घोसाळकर, लक्ष्मण वडले, भास्कर अंबेकर, शिवाजी चोथे, संतोष सांबरे, ए.जे. बोराडे, अनिरूद्ध खोतकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांचीही उपस्थिती होती.
वीज बिलाच्या मुद्यावर लक्ष घालू
जालना : विदर्भातील उद्योजकांना जी विजेच्या बिलात सबसिडी देण्यात त्याच धर्तीवर मराठवाड्यातील उद्योजकांनाही ती द्यावी अशी मागणी येथील उद्योजकांनी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. ठाकरे यांनी सभा संपल्यावर येथील उद्योजकांशी चर्चा केली. यावेळी आज उशीर झाला आहे, त्यामुळे मी भाषण करणार नाही, परंतु त्यांनी  उद्योजकांची भेट घेऊन दहा ते पंधरा मिनिटे चर्चा केली. त्यावेळी या महत्वाच्या प्रश्नावर आपण मुंबईत उर्जामंत्र्यांसोबत बैठक बोलावून हा प्रश्न निश्चित मार्गी लावू, असे आश्वासन दिले.
रेशीम कापड निर्मितीचा उद्योग उभारणार- खोतकर
चीनमधून भारतामध्ये आलेले रेशीम पीक आता संपूर्ण भारतभर झपाट्याने विकसित झाले आहे. अत्यल्प पाण्यामध्ये खात्रीपूर्ण उत्पादन देणारे पीक म्हणून याकडे पाहिले जात आहे. महाराष्ट्रात जालना जिल्हा रेशीम उत्पादनात आघाडीवर आहे. त्यामुळे येथे पहिली रेशीम कोष खरेदी आपण सुरू केली. आता यासाठी इमारत बांधणार असून, भविष्यात जालन्यात रेशीम कापड निर्मितीचा उद्योग उभारणीचा मानस असून, त्यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांजवळ शब्द टाकावा, अशी अपेक्षा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केली.

Web Title: Aditya Thackeray aims to get rid of peasant debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.