...तर आगामी अधिवेशनापर्यंत राज्यपाल बदलून दाखवा; आदित्य ठाकरेंचे सरकारला थेट चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 03:39 PM2023-02-08T15:39:20+5:302023-02-08T15:40:36+5:30

'आमच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, उद्योग राज्यात आणले पण कधी दिखावा केला नाही.'

Aditya Thackeray: Change the governor until the next session; Aditya Thackeray's direct challenge to the government | ...तर आगामी अधिवेशनापर्यंत राज्यपाल बदलून दाखवा; आदित्य ठाकरेंचे सरकारला थेट चॅलेंज

...तर आगामी अधिवेशनापर्यंत राज्यपाल बदलून दाखवा; आदित्य ठाकरेंचे सरकारला थेट चॅलेंज

googlenewsNext


दिलीप सारडा 
बदनापूर -
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आगामी अधिवेशनापर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल बदलून दाखवावेत, असे जाहीर आव्हान माजी मंत्री तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे आज(दि. 8) आदित्य ठाकरे यांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देत असून आगामी अधिवेशनात राज्यपाल म्हणून तिथे भाषण करायला येतील ते नवीन राज्यपाल आणून दाखवा.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, राज्यपाल स्वतः म्हणतात की मला इथे राहण्याची इच्छा नाही. आता मुख्यमंत्र्यांनी केंद्राला सांगावे आणि राज्याताल नवीन राज्यपाल मिळवून द्यावेत. आज राज्यामध्ये शेतकरी खुश नाही, महिला खुश नाही. सध्याचे राज्यात घटनाबाह्य सरकार असून हे सरकार पडणार म्हणजे पडणारच. आज कोर्टात केस चालू आहे, ज्या मिनिटाला संविधानात्मक निकाल येईल, त्यावेळी हे सरकार पडेल. सत्ता कोणाची असो परंतु सत्यासमोर सत्ता जायला वेळ लागत नाही, अशी टीका त्यांनी केली.

अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. दोन सरकारमध्ये फरक हाच असतो. आमचे सरकार आले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रथम द्यायची, असा निर्धार केला होता व त्याप्रमाणे दोन लाखापर्यंत सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. आताच्या सरकारने प्रचंड अटी शर्ती लावून शेतकऱ्यांना मदत दिली. आम्ही आमचे कर्तव्य म्हणून हे काम केले. याचा गाजावाजा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी होल्डिंग लावले नाही , असंही आदित्य म्हणाले.

ते पुढे म्हणतात, महाराष्ट्रात नवीन उद्योग येईना, रोजगार मिळेना. ज्या उद्योगाला आम्ही राज्यात आणण्यासाठी मंजुरी दिली होती तो उद्योग गुजरातमध्ये गेला. ते म्हणतात की, स्वित्झर्लंडमधील डावोसमध्ये जाऊन 80 हजार कोटीची परदेशी गुंतवणूक आणली. पण, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये आणली. आम्ही बोलून नव्हे तर करून दाखवलं आणि दुसऱ्या बाजूला हे मुख्यमंत्री अठ्ठावीस तासांसाठी डावोसला जाऊन चाळीस कोटी खर्च करुन येतात, असा घणाघातही आदित्य यांनी केला. 

 

Web Title: Aditya Thackeray: Change the governor until the next session; Aditya Thackeray's direct challenge to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.