आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रा करून गेले अन् अर्जुन खोतकर शिंदे गटात सहभागी झाले ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 02:04 PM2022-07-25T14:04:28+5:302022-07-25T14:05:14+5:30
मी सध्या शिवसेनेत आहे, असे खोतकर यांनी स्पष्ट केले. पण भविष्यात राहणार का? यावर उत्तर देणे खोतकरांनी टाळले आहे.
जालना: माजीमंत्री आदित्य ठाकरे दोन दिवसांचा औरंगाबाद दौरा करून गेले अन् जालन्यात शिवसेनेला मोठा झटका बसल्याची चर्चा आहे. माजीमंत्री अर्जुन खोतकर शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. मागील काही दिवसांमध्ये खोतकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांची दुसऱ्यांदा भेट झाली आहे. विशेष म्हणजे, दिल्लीत झालेल्या भेटीत खोतकरांचे कट्टर राजकीय विरोधक केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची उपस्थिती होती. या भेटीचा एक फोटो व्हायरल झाल्याने खोतकर यांच्या शिंदे गटात सामील होण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
जालन्यात शिवसेनेचा चेहरा असलेले माजीमंत्री अर्जुन खोतकर शिंदे गटात गेले तर उद्धव ठाकरे यांना हा मोठा झटका असेल असे बोलण्यात येत आहे. खोतकर मागील काही दिवसांपासून ईडीच्या रडारवर आहेत. त्यांचा साखर कारखाना, घर आणि इतर ठिकाणी ईडीने सातत्याने कारवाई केली होती. तसेच याकाळात सेनेत ते एकटे पडल्याची दिसून येत होते. यामुळे खोतकर अस्वस्थ असल्याची चर्चा देखील होती. त्यानंतर राज्यात शिवसेनेत पडलेली फुट आणि झालेले सत्तांतर यामुळे खोतकर पुन्हा चर्चेत आले आहेत. दिल्ली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्जुन खोतकर, भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचा एकत्रित फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. मागील काही दिवसांतील शिंदे - खोतकर यांची ही दुसरी भेट होती. तसेच खोतकर आणि मुखमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी खा. हेमंत पाटील यांनी मध्यस्थी केल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्जुन खोतकर यांच्यात चर्चा सुरु असून लवकरच याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री म्हणाले एकत्र काम करा, दानवेंची माहिती
दरम्यान, जालना जिल्ह्यात खोतकर यांचे कट्टर राजकीय विरोधक केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीत उपस्थित होते. खोतकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर थेट बोलणे टाळून दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी, आतापर्यंत जे काही झाले ते विसरा आणि यापुढे सोबत काम करा, असे उत्तर दिले.
वेगळे अर्थ काढू नये - अर्जुन खोतकर
यासर्व चर्चांवर अर्जुन खोतकर यांनी दिल्ली येथून प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत भेट झाल्याने चर्चा तर होणार आहे. पण मी सध्या शिवसेनेत आहे, असे खोतकर यांनी स्पष्ट केले. पण भविष्यात राहणार का? यावर उत्तर देणे खोतकरांनी टाळले आहे. शिंदे यांनी बंड केल्यानंतर ठाकरे यांनी खोतकर यांना उपनेतेपद दिले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यात देखील खोतकर यांची उपस्थिती होती.