प्रशासन म्हणतेय मागेल त्याला काम; ‘सिटू’चा कामासाठी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:56 AM2019-06-04T00:56:05+5:302019-06-04T00:56:42+5:30
सोमवारी अनेक गावांमधील मजुरांनी एकत्रित येत दुपारी एक वाजेच्या दरम्यान भर उन्हामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : प्रशासनाकडून अनेक ग्रामपंचायतींमध्ये मागेल त्याला काम देण्यासाठी सेल्फवरील कामाचे नियोजन केल्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे मात्र, मागणी करूनही काम मिळत नसल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन, सिटू यांच्या वतीने करण्यात येत आहे.
सोमवारी अनेक गावांमधील मजुरांनी एकत्रित येत दुपारी एक वाजेच्या दरम्यान भर उन्हामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी त्यांनी
प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून मागणी करूनही काम मिळत नसल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धरणग्रस्त आणि दुष्काळग्रस्त परतूर तालुक्यातील विविध गावांमध्ये सात महिन्यांपासून मनरेगाच्या कामाची मागणी करूनही मजुरांना कामे दिली जात नाहीत. त्यामुळे ज्या गावांमध्ये मागणी करूनही कामे दिली नाही, अशा गावातील मजुरांना बेरोजगारीचा भत्ता तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली असून, कामे मिळावीत म्हणून यापूर्वीही खांडवी, पाटोदा, मंठा तसेच आंबा, वरफळ येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
एकीकडे हे आंदोलन सुरू असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र सचिवांकडून दुष्काळाचा आढावा घेतला जात होता. या मोर्चात कामगार नेते अण्णा सावंत, सरिता शर्मा, सचिन थोरात, मुक्ता शिंदे, दीपक दवंडे, स्वाती प्रधान, बंडोपंत कणसे, मारोती खंदारे, मधुकर मोकळे आदींचा सहभाग होता.