कौतुकास्पद ! कोरोनावर मात करून ६४ योद्धे पुन्हा मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 07:47 PM2020-08-19T19:47:53+5:302020-08-19T19:49:47+5:30
कर्मचाऱ्यांनी पुन्हा पुन्हा कर्तव्यावर रुजू होऊन कोरोना लढ्यात सहभागी होऊन जनसेवा सुरू केली आहे.
- विजय मुंडे
जालना : कोरोना संसर्गात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या आरोग्य, पोलीस दलातील ८४ जणांना आजवर कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ६४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनावर मात केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुन्हा पुन्हा कर्तव्यावर रुजू होऊन कोरोना लढ्यात सहभागी होऊन जनसेवा सुरू केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि आरोग्य, पोलीस, महसूल, नगर पालिकांसह इतर प्रशासकीय विभागावरील कामाचा ताण वाढला. जिल्ह्यात आजवर ३८५० कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. त्यातील १११ जणांचा मृत्यू झाला असून, यशस्वी उपचारानंतर २४६५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील ३८५० कोरोना बाधितांमध्ये फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या आरोग्य विभागातील ६० वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर जिल्हा पोलीस दलातील २४ अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. सहकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या मानसिकतेवरही परिणाम झाला होता. मात्र, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी वेळोवेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून चर्चा करीत मानसिकता बळकट करण्याचे काम केले. त्यामुळे रूग्णसंख्या वाढत असतानाही फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जनसेवेचा उत्साह आजही कायम आहे.
आरोग्य विभागातील ६० जणांना कोरोनाची बाधा : यात शासकीय १३ व खाजगी १० अशा २३ डॉक्टरांचा समावेश आहे. त्यातील १३ शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांमधील सात जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सहा जणांवर उपचार सुरू आहेत. खाजगी १० वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी ८ जणांनी कोरोनावर मात केली असून, एकावर उपचार सुरू आहेत. तर एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्टाफ नर्समध्ये १२ शासकीय स्टाफ नर्स कोरोना बाधित झाल्या होत्या. पैकी ८ जणींनी कोरोनावर मात केली असून, चौघींवर उपचार सुरू आहेत. तर खाजगी रूग्णालयातील १० जणींना कोरोना झाला होता. त्यातील ९ जणी कोरोनामुक्त झाल्या असून, एका परिचारिकेचा मृत्यू झाला आहे. तर इतर कर्मचाऱ्यांमध्ये शासकीय मधील ७ व खाजगी रूग्णालयातील ८ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. शासकीय, खाजगीमधील १५ बाधितांपैकी १३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर दोघांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा पोलीस दलातील २४ जणांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यातील एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर १९ जणांनी कोरोनावर मात केली असून, चौघांवर उपचार सुरू आहेत.
इतर विभागातही बाधित रूग्ण
कोरोनाच्या लढ्यात काम करणाऱ्या आरोग्य, पोलीस दलासह इतर प्रशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील अनेकांनी कोरोनावर मात करून पुन्हा कर्तव्यावर रुजू होत जनसेवा सुरू केल्याचे सांगण्यात आले.
काऊन्सलिंगवर भर
कोरोनाच्या लढ्यात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काऊन्सलिंग करण्यावर भर दिला आहे. बाधितांवर यशस्वी उपचार केल्याने ते कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाच्या लढ्यात आरोग्य विभागासह इतर प्रशासकीय विभागांचे एकत्रित काम सुरू आहे.
- डॉ. अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक, जालना
कर्तव्य आणि दक्षतेची सांगड
कोरोनाच्या लढ्यात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांशी वेळोवेळी चर्चा करून मार्गदर्शन केले. दक्षतेसाठी आरोग्य तपासणी, औषधांचे वाटप, सुरक्षेची साधणे दिली. कोरोनाच्या लढ्यात स्वत:च्या आरोग्याची काळजी घेऊन सर्वजण कर्तव्य बजावत आहेत.
- एस. चैतन्य, पोलीस अधीक्षक, जालना