कौतुकास्पद! आयएएस दाम्पत्याचा मुलगा गिरवतोय जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीत धडे
By विजय मुंडे | Published: July 14, 2023 12:07 PM2023-07-14T12:07:33+5:302023-07-14T12:09:00+5:30
दर्जेदार शिक्षणावर विश्वास ठेवत आयएएस दाम्पत्याने स्वतःच्या मुलास जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीत प्रवेश दिल्याने कौतुकाचा विषय ठरत आहे.
जालना : मुलं इंग्रजी शाळेत घालण्याकडे नोकरदार पालकांचा कल असतो. त्यात शासकीय नोकरी म्हटलं की मुलं इंग्रजी शाळेतच शिक्षणासाठी पाठविली जातात. परंतु, जालना जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा मीना याला अपवाद ठरल्या आहेत. सीईओ मीना यांनी त्यांचा मुलगा अथर्व याला दरेगाव (ता.जालना) येथील अंगणवाडीत प्रवेश दिला आहे. विशेष म्हणजे, वर्षा मीना यांचे पती विकास मीना हे देखील छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे सीईओ आहेत. सरकारी अंगणवाडीतील दर्जेदार शिक्षणावर विश्वास ठेवत आयएएस दाम्पत्याने स्वतःच्या मुलास जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीत प्रवेश दिल्याने कौतुकाचा विषय ठरत आहे.
खासगी शाळा त्यात इंग्रजी शाळांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत. अंगणवाड्यांची अवस्थाही वेगळी नाही. पूर्व प्राथमिक शिक्षणही इंग्रजीतून देणाऱ्या शाळा गल्ली-बोळात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शासकीय नोकरी असणारेच नव्हे तर खासगी नोकरी असणारेही अनेकजण इंग्रजी शाळेतच मुलांना शिक्षणासाठी पाठवित आहेत. याचा परिणाम अंगणवाड्यांसह जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्येवर होत आहे. परंतु, जालना जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा मीना यांनी त्यांचा मुलगा अथर्व मीना याला दरेगाव (ता.जालना) येथील अंगणवाडीत प्रवेश दिला आहे. सीईओंचा मुलगाच अंगणवाडीत पूर्वप्राथमिकचे धडे गिरवू लागल्याने ग्रामीण भागातील पालकांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे. सीईओंनी शासकीय अंगणवाडीत मुलाला प्रवेश देवून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. यामुळे इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही असाच विचार केला तर ग्रामीण भागातील अंगणवाड्या, जिल्हा परिषदेच्या शाळांना गतवैभव प्राप्त होण्यास उशिर लागणार नाही, अशी चर्चाही पालक वर्गात होत आहे.
अंगणवाडीत दर्जेदार शिक्षण दिले जाते
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या अंगणवाडीत दर्जेदार शिक्षण दिले जाते. वेळोवेळच्या पाहणीतून हे समोर आले आहे. त्यामुळे मी स्वत:च्या मुलाचा अंगणवाडीत प्रवेश दिला असून, तो ही इथे रमला आहे.
- वर्षा मीना, सीईओ, जि.प. जालना