धरणग्रस्तांची वाट १५ वर्षांनंतरही बिकटच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 12:20 AM2019-10-28T00:20:44+5:302019-10-28T00:20:45+5:30
परतूर येथील निम्न दुधना प्रकल्पात गेलेल्या पाच गावांना १५ वर्षानंतरही रस्ता नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : परतूर येथील निम्न दुधना प्रकल्पात गेलेल्या पाच गावांना १५ वर्षानंतरही रस्ता नाही. यामुळे नागरिकांना पावसाळ््यात चिखल व खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे.
परतूर व परिसरातील २१ गावे निम्न दुधना प्रकल्पात गेली आहेत. त्यानंतर या गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. पुनर्वसित गावांमध्ये शासनाने भौतिक सुविधा पुरविल्या होत्या. परंतु, यातील रस्ते, नाल्या, शाळा, समाज मंदिर, वीज, पाणी पुरवठा योजना इ. कामे अर्धवटच आहेत. तर काही सुविधा धरणग्रस्त गावात येण्याआधीच गायब झाल्या. या कामांवर कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे ठेकेदारांनी ही कामे मर्जीप्रमाणे कामे केली. त्यामुळे गावांना आजही रस्त्याची प्रतीक्षा आहे.
तालुक्यातील पाडळी, रोहिणा बू, एकरूखा, नागापूर, मापेगाव या पाच गावांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. या गावात थातूर- मातूर खडीकरण करून रस्ते तयार करण्यात आले. दर्जाहीन रस्ते केल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून, मोठ्या प्रमाणात चिखल जमा झाला आहे.
ग्रामस्थांना चिखल तुडवत गावाबाहेर जावे लागते. गावातील नाल्या पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. तर या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.
याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन कामे करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.