एका दुचाकीला धडकल्यानंतर अनियंत्रित बसने दुसऱ्या दुचाकीस उडवले; दोन तरुणांचा जागीच मृत्यू
By विजय मुंडे | Published: March 15, 2023 05:38 PM2023-03-15T17:38:01+5:302023-03-15T17:38:19+5:30
अपघातानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला धडकली.
अंबड (जि.जालना) : दुचाकीला धडक दिल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुसऱ्या दुचाकीला जाऊन धडकली. या विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अंबड शहराजवळील रामनगर पाटीजवळ घडली.
लक्ष्मण वसंत गांडगे (१९ रा. कासारवाडी), राजू गणपत भोईटे (३२ रा. झिरपी ता.अंबड) अशी मृतांची नावे आहेत. बीड आगाराची जालना- बीड ही बस (क्र.एम.एच.२०- बी.एल. ३६३२) बुधवारी दुपारी बीडकडे जात होती. ही बस अंबड शहराजवळील रामनगर पाटीजवळ आली असता अंबडकडे जाणाऱ्या दुचाकीला बसने धडक दिली. अपघातानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात लक्ष्मण गांडगे, राजू भोईटे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर शिला राजू भोईटे (३० रा. झिरपी), रोहिदास हरिभाऊ बर्डे (३० रा. सोनक पिंपळगाव) हे गंभीर झाले.
तर बसमधील बागडाबाई निवृत्ती तवरे (६० रा. गेवराई जि.बीड), मीना बापूराव लांडगे (४० रा. वडगाव ता. पैठण) या दोघी किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले. जखमींवर अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी जालना येथील शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. घटनास्थळी अंबड पोलिसांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.