'नोकरीस रुजू होऊन बहिणीच्या लग्नाला येतो'; फोननंतर इंजिनीअरचा ३ दिवसांनी मृतदेहच सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2022 06:13 PM2022-03-02T18:13:03+5:302022-03-02T18:13:30+5:30
२८ फेब्रुवारी रोजी कॅम्पस निवडीमधून मिळालेल्या नोकरीस रुजू होऊन बहिणीच्या विवाहासाठी गावी जाणार होता.
भोकरदन ( जालना ) : नाशिकयेथून २६ फेब्रुवारीपासून गायब असलेला तालुक्यातील कोठी तांदुळवाडी येथील तरुण अभियंता अभिषेक कैलास खरात (२२) याचा आज दुपारी गंगापूर धरणाच्या सय्यदपिंप्री परिसरातील कॅनालमध्ये मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे, २८ फेब्रुवारी रोजी कॅम्पस निवडीमधून मिळालेल्या नोकरीस अभिषेक रुजू होऊन बहिणीच्या विवाहासाठी गावी जाणार होता. त्यापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने खरात परिवार आणि कोठी तांदुळवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
कोठी तांदुळवाडी येथील कैलास खरात यांचा एकुलता एक मुलगा अभिषेक नाशिक येथील केके वाघ इंजिनिरिंग महाविद्यालयात शिक्षण घेत असे. नुकतेच त्याचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले होते. तसेच कॅम्पस मुलाखतीत त्याला नोकरीसुद्धा मिळाली होती. मुलास नोकरी लागल्याने खरात कुटुंबासह सर्व गावकरी आनंदी होते. चुलत बहिणीचे ९ मार्च रोजी लग्न होते त्यामुळे २८ तारखेस नोकरीस रुजू होऊन गावी येणार असल्याचे अभिषेकने घरी सांगितले होते.
दरम्यान, २६ फेब्रुवारीस रात्री १० वाजेच्या दरम्यान एका हॉटेलमधून जेवण्यास गेला होता. त्यानंतर तो वसतिगृहावर परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी अभिषेकच्या मित्रांनी त्याच्या आईवडिलांना तो हॉस्टेलवर आला नसल्याची माहिती दिली. यानंतर अभिषेकचे वडील, काका व इतर नातेवाईकांनी नाशिक गाठून शोध सुरु केला. मात्र, अभिषेकचा शोध लागला नाही.
केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील अभिषेकच्या तपासाबद्दल पोलिसांना सूचना दिल्या. अभिषेक कुठल्याच सीसीटीव्हीमध्ये आढळून न आल्याने पोलिसांनी वेगळ्या बाजूने तपास सुरु केला. अभिषेकच्या हॉस्टेलच्या बाजूने गेलेल्या गंगापूर धरणाच्या कॅनालमध्ये त्याचा शोध घेण्यात आला. तब्बल तीन दिवसांनी आज दुपारी सय्यद पिंप्री परिसरातील कॅनालमध्ये अभिषेकचा मृतदेह आढळून आला.
बहिणीचे लग्न पुढे ढकलले
अभिषेक गायब झाल्याची माहिती मिळाल्यापासून त्याचा आईने जेवण बंद केले आहे. आज त्याच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्यासह कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. होतकरू आणि तरुण अभियंत्याच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. आज सायंकाळी गावात अभिषेकवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, ९ मार्च रोजी होणारा अभिषेकच्या बहिणीचा विवाह देखील पुढे ढकलण्यात आला आहे.