टोमॅटोनंतर आता वांग्याचाही चिखल: भाव नसल्याने शेतकऱ्याने रस्त्यावर फेकले वांग्यांचे कॅरेट
By महेश गायकवाड | Published: March 21, 2023 05:48 PM2023-03-21T17:48:10+5:302023-03-21T17:48:41+5:30
सध्या सर्वच शेतीमालाचे भाव पडले आहेत. भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जालना : टोमॅटोनंतर आता शेतकऱ्यांच्या वांग्यांनाही बाजारात भाव मिळत नाही. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील आठवडी बाजारात आणलेल्या वांग्याला एक रुपया किलोपक्षाही कमी भाव मिळाला. त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने वाग्यांचे कॅरेट रस्त्यावर फेकून दिले. तर अन्य शेतकऱ्यांना पाच आणि दहा रुपयांत टोपलेभर वांगे विकून कॅरेट रिकामे केल्याचे बाजारात पाहायला मिळाले.
सध्या सर्वच शेतीमालाचे भाव पडले आहेत. भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आधी टोमॅटोचा बाजारात चिखल झाल्यानंतर आता वाग्यांनाही बाजारात कोणी विचारानासे झाले आहे. पिंपळगाव रेणुकाई येथील शेतकऱ्यांनी मंगळवारच्या आठवडी बाजारात शेतातील वांगे विक्रीसाठी आणले होते. त्यांच्या २० किलो वाग्यांच्या क्रेटला तीस रुपयांचा भाव मिळाला. काहींच्या वाग्यांची तर शेवटपर्यंत विक्रीच झाली नाही. फुकट देऊनही वांगे कोणी घेतले नाही. रामेश्वर देशमुख या शेतकऱ्याने बेभावान व्यापाऱ्याला वांगे देण्यापेक्षा ते रस्त्यावर फेकून दिले.
व्यापारी माल घेत नाही
मी एक एकर वांगी लागवड केली होती. हे वांगे तोडण्यासाठी किमान तीन ते चार मजूर शेतामध्ये लावले होते. एक ते दीड गुंठ्यातील वांगे बाजारात विक्रीसाठी आणले होते. मात्र, व्यापारी त्या वांग्यांना घेत नसल्यामुळे हे वांगे रस्त्यावर फेकून दिले.
- रामेश्वर देशमुख, शेतकरी, पिंपळगाव रेणुकाई.