रोहित्रासाठी आक्रमक ग्रामस्थांनी महावितरणच्या अभियंत्यांना गावातच थांबवून ठेवले
By शिवाजी कदम | Published: July 20, 2023 02:06 PM2023-07-20T14:06:06+5:302023-07-20T14:06:28+5:30
उडवाउडवीचीउत्तरे दिल्याने संतप्त झालेल्या सरपंचासह ग्रामस्थांनी घेराव घातला.
तळणी : मंठ्याकडून देवठाणाकडे जाणाऱ्या महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांना उस्वद ग्रामस्थांनी अडवून ठेवले. जो पर्यंत नादुरुस्त रोहित्र बदलून मिळणार नाही. तोपर्यंत जाऊ देणार नाही. असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. ही घटना २० जूलै गुरवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान उस्वद बस स्टॅण्डसमोर घडली आहे.
उस्वद येथील थ्री फेज रोहित्र २० दिवसांपासून जळालेले आहे. सरपंच संतोष सरोदे यांच्यासह ग्रामस्थांनी ९० टक्के थकबाकी महावितरणकडे भरली. मात्र, त्यानंतर महावितरणने रोहित्र देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने अर्धेगाव अंधारात आहे. महावितरणचे कनिष्ठ अभियंता ए. एम.जंगम हे इतर कामासाठी देवठाणा गावाकडे जात असताना उस्वद ग्रामस्थांनी रोहीत्र देण्याची मागणी केली. मात्र, अभियंता जंगम यांनी उडवाउडवीचीउत्तरे दिल्याने संतप्त झालेल्या सरपंचासह ग्रामस्थांनी घेराव घातला. जोपर्यंत रोहित्र मिळणार नाही तोपर्यंत इतर कामे करू नये. असे म्हणत अभियंत्यांना घेराव घातला. एक तासानंतरही अभियंत्यांना गावात थांबवून ठेवण्यात आले आहे.
नादुरुस्त रोहित्र बदलून द्यावे ...
उस्वद येथील सरपंच संतोष सरोदे म्हणाले की, अनेक वेळा नादुरुस्त रोहित्र बदलून देण्याची विनंती केली. मात्र, याकडे कनिष्ठ अभियंत्यांनी दुर्लक्ष केले. यामुळे अभियंत्यांना उस्वद येथे सन्मानपूर्वक उपहारगृहात बसून ठेवले आहे. जळालेले रोहित्र जोपर्यंत बदलून देणार नाही. तोपर्यंत त्यांना जाऊ देणार नाही. असा प्रवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
घटनास्थळाकडे पोलीस रवाना ...
या संदर्भात कनिष्ठ अभियंता एम.जंगम यांनी पोलिसांना संपर्क करून घटनेची माहिती दिली आहे. घटनास्थळाकडे पोलीस रवाना झाले आहेत.