कृषी विभागाचा कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 12:33 AM2018-09-07T00:33:31+5:302018-09-07T00:34:54+5:30
कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाने बदनापूर तालुक्यातील राजूर, दाभाडी येथे गुरूवारी भेट देऊन तपासणी केली असता, कृषी विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद केली. यामुळे दाभाडी येथील १४ तर अन्य तीन कृषी परवाने निलंबित करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाने बदनापूर तालुक्यातील राजूर, दाभाडी येथे गुरूवारी भेट देऊन तपासणी केली असता, कृषी विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद केली. यामुळे दाभाडी येथील १४ तर अन्य तीन कृषी परवाने निलंबित करण्यात आली.
कृषी विभागाच्या वतीने बियाणे विक्रेत्यांच्या दुकानामध्ये कोणकोणत्या कंपनीचे उत्पादन विक्रीसाठी ठेवले आहे. याची नियमीतपणे तपासणी केली जाते. याचाच एक भाग म्हणून कृषी अधीक्षक विजय माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय गुणनियंत्रक डी. एम. वडकुते आणि जालना येथील गुणनियंत्रक सयप्पा गरांडे यांनी दाभाडीत भेट दिली. त्यावेळी कीटकनाशक, रासायनिक खते तसेच बियाणांची तपासणी करत असल्याची इतर बियाणे विक्रेत्यांना कळाली. कुठलेतरी भरारी पथक आल्याची कुणकुण लागल्याने दाभाडी येथील सर्व बियाणे विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद करून तेथून पळ काढला.
या व्यापाऱ्यांच्या कारवाईमुळे बियाणांची तपासणी करणारे गुणनियंत्रक पथकाला काहीही हाती लागले नाही. ही एक प्रकारची कायदेशीरदृष्ट्या गंभीर बाब आहे.
दाभाडी येथील बियाणे विक्रेत्यांनी अशी कृती केल्याची माहिती गुणनियंत्रण पथकाने कृषी अधीक्षक माईनकर यांना कळविली. त्यांनी तातडीने निर्णय घेत १७ बियाणे विक्रेत्यांचे परवाने निलंबित केल्याने खळबळ उडाली आहे.