ऐन दिवाळीत जालन्यातील एटीएममध्ये खडखडाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 12:13 AM2019-10-28T00:13:52+5:302019-10-28T00:14:19+5:30
ऐन दिवाळीत एटीएममध्ये खडखडाट आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : ऐन दिवाळीतएटीएममध्ये खडखडाट आहे. यामुळे ग्राहकांत नाराजी आहे. बहुतांश एटीएमबाहेर ‘नो कॅश’चा फलक लावण्यात आला आहे. यामुळे गैरसोय होत आहे. दिवाळी असल्याने बँकांनी नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, त्यांच्या दुर्लक्षाचा फटका दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना बसला आहे.
दिवाळी सणात मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. यासाठी बहुतांश लोक एटीएममधून पैसे काढतात. दिवाळीमुळे शनिवारपासूनच बहूतांश एटीएममध्ये चलन तुटवडा दिसून आला. पुढील तीन दिवस बँकांना सुटी असल्याने पुन्हा अडचण येणार आहे. यासाठी बँकांनी एटीएममध्ये कॅश भरणे गरजेचे आहे.
शुक्रवारी दिवाळी असल्याने खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढली. त्या व्यवहारांचा भार एटीएम केंद्रांवर पडला. मुख्य बाजारपेठांच्या परिसरातील एटीएम केंद्रांमध्ये शनिवारी व रविवारी पैसेच शिल्लक नसल्याचे चित्र होते. मोक्याच्या ठिकाणच्या एटीएम केंद्रांवर चलन तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांनी आपला मोर्चा गल्लोगल्ली असणाºया एटीएम केंद्रांकडे वळविला. त्यामुळे त्या केंद्रांवरही पैशांचा खडखडाट निर्माण झाल्याने अनेक नागरिकांना रिकाम्या हातानेच माघारी परतावे लागले.
एटीएम केंद्रांमध्ये रक्कम जमा करण्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या नजीक असणाºया बॅकांच्या शाखेची असते. तसेच बाहेरील कंपन्यांकडून देखील (आऊटसोर्स) हे काम केले जाते. लागोपाठ येणाºया सुट्यांच्या वेळी एटीएम केंद्रे झटकन रिकामी होतात. अशावेळी खबरदारी म्हणून आगाऊ स्वरुपात एटीएम केंद्रांवर रोख भरणा करुन ठेवला जातो. प्रत्येक एटीएममध्ये पैसे टाकण्याची मर्यादा निश्चित असल्याने त्यांनाही तेवढेच पैसे त्यामध्ये भरता येतात.
बँकांनी लक्ष देण्याची मागणी
दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांवर पैसे काढण्यासाठी सुरू असलेल्या एटीएम केंद्रांचा शोध घेण्याची वेळ आली. त्यामुळे सुरू असलेल्या एटीएम केंद्रांवर नागरिकांच्या मोठ्या रांगा होत्या. ऐन सणासुदीच्या काळात सर्व बँकांनी एटीएम मशीन सुरू राहतील, याची काळजी घेण्याची गरज आहे.
बाजारपेठ परिसरातील एटीएम बंद
गांधी चमन, शिवाजी पुतळा, कचेरी रोड, शनि मंदिर, बडी सडक, सिंधी बाजार यांसह विविध ठिकाणच्या बाजारपेठांतील एटीएममध्ये पैसे नसल्याचा फलक लावण्यात आला होता.