आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या; चिठ्ठी लिहून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 06:47 PM2023-10-29T18:47:04+5:302023-10-29T18:47:33+5:30
अजय गायकवाड हा आत्महत्या करण्यापूर्वी अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी गेला होता.
सुखापुरी (जि.जालना) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी २७ वर्षीय तरूणाने चिठ्ठी लिहून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबड तालुक्यातील कुक्कडगाव येथे शनिवारी रात्री घडली. अजय रमेश गायकवाड (२७) असे मयताचे नाव आहे.
अजय गायकवाड हा आत्महत्या करण्यापूर्वी अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी गेला होता. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मी आत्महत्या करीत आहेत, असे त्याने चिठ्ठीत लिहिले आहे. अजयचे ४ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला २ वर्षाची मुलगी आहे. त्याच्या वडिलांचे हृदयविकाराने निधन झालेले आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई व एक भाऊ आहे.
अजयच्या मृतदेहावर रविवारी सुखापुरी येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता कुक्कडगाव येथील स्मशानभूमी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनास्थळी अंबड येथील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचन, पोलिस बीट जमादार कुटे, गोंदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे, मंडळ अधिकारी जायभाये, बीट जमादार बाबासाहेब खवल, उद्धव गायकवाड राजेंद्र गायकवाड, दीपक पटेकर जनार्दन गायकवाड गणेश गायकवाड आदींची उपस्थिती होती.