मेहनत अन् नियोजनातून भावंडांची किमया, ३ एकर मिरचीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न
By शिवाजी कदम | Published: August 4, 2023 07:02 PM2023-08-04T19:02:11+5:302023-08-04T19:03:36+5:30
नोकरीच्या मागे न पळता या युवकांनी आपल्याकडे असलेली वडिलोपार्जित जमीन कसण्यास सुरुवात केली.
- गणेश पंडित
केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील बरंजळा साबळे येथील तरुण शेतकरी समाधान गाढे व अमोल गाढे या भावांनी तीन एकर शेतीमध्ये विविध जातींची मिरची लागवड केली आहे. त्यातून त्यांना साडेसात लाखांचे भरघोस उत्पादन मिळाले आहे. खर्च वजा करता सहा लाखांचा निव्वळ नफा त्यांना प्राप्त झाला आहे. आणखी दोन ते तीन लाखांच्या उत्पन्नाची त्यांना अपेक्षा आहे.
शेती हा नफ्याचा व्यवसाय नाही, ही संकल्पना मोडीत काढत बरंजळा साबळे येथील गाढे बंधूंनी शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळवले आहे. नोकरीच्या मागे न पळता या युवकांनी आपल्याकडे असलेली वडिलोपार्जित जमीन कसण्यास सुरुवात केली. जिद्द मेहनतीची जोड देऊन मिरचीचे उत्पादन घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांनी तीन एकर शेतीत शिमलासह विविध प्रकारच्या मिरचीची लागवड केली. त्यातून त्यांना भरघोस उत्पादन मिळत आहे.
समाधान गाढे यांनी पुणे विद्यापीठातून बीएची पदवी घेतली. तसेच अमोल गाढे यांनी देखील पदवीधर आहेत. शिक्षण घेत असतानाच त्यांनी शेतीची कास धरून मिरची उत्पादन घेण्याकडे लक्ष केंद्रित केले. पिकांचे व्यवस्थित, निगा व योग्य नियोजन केल्याने चांगल्या उत्पन्नाची हमी मिळते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. सध्या त्यांनी मिरची तोडणीला सुरुवात केली असून, चार ते साडेचार हजारांचा भाव मिळत आहे. त्यांना साडेसात लाखांचे उत्पादन मिळाले असून, एक लाख पन्नास हजार रुपये खर्च लागलेला आहे. मिरची उत्पन्नातून गाढे बंधूंना सहा लाखांचा निव्वळ नफा मिळाला आहे.
मेहनत केल्यास यश नक्की
युवकांना शेती करण्यात रस राहिलेला नसल्याचे दिसून येत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती तोट्यात असल्याचे सांगण्यात येते. नुकसान झाल्यास सरकारी मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, पिकांच्या योग्य नियोजनासह मेहनत केल्यास यश नक्कीच मिळते, हे गाढे बंधूंनी सिद्ध करून दाखवले आहे.
योग्य नियोजन आवश्यक
आम्ही दोन्ही भाऊ वडिलोपार्जित शेती जिद्द व मेहनतीच्या जोरावर कसत आहोत. शिक्षण घेऊन सुद्धा नोकरीच्या मागे न लागता नियोजनबद्ध शेती केल्याने चांगले उत्पन्न मिळत आहे. शेतीमध्ये मेहनत करण्याची तयारी असेल तर उत्पन्नाची हमी असतेच. तरुणांनी आधुनिक शेतीकडे वळण्याची गरज असल्याचे समाधान गाढे व अमोल गाढे यांनी सांगितले.