चार ठाण्यांतील आरोपी एकाच पोलीस कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 12:49 AM2019-12-18T00:49:36+5:302019-12-18T00:50:18+5:30
शहरातील चारपैकी केवळ सदरबाजार पोलीस ठाण्यात आरोपी ठेवण्यासाठी कोठडी आहे
विजय मुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील चारपैकी केवळ सदरबाजार पोलीस ठाण्यात आरोपी ठेवण्यासाठी कोठडी आहे. त्यामुळे इतर पोलीस ठाण्यातील आरोपी सदरबाजार पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवले जातात. परिणामी, कोठडीतील आरोपी संभाळणे, वैद्यकीय उपचार, तपास इ. कामांसाठी मात्र, संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते.
उद्योग नगरी म्हणून ओळखल्या जाणा-या जालना शहरातील कायदा- सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सदरबाजार पोलीस ठाणे, कदीम पोलीस ठाणे कार्यरत होते. मात्र, शहराचा वाढलेला विस्तार पाहता स्वतंत्र चंदनझिरा पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. त्यात तालुका जालना पोलीस ठाणेही शहरातच असून, शहर परिसरातील अनेक घटना, घडामोडीचे गुन्हे या ठाण्यात दाखल होतात. कदीम पोलीस ठाण्याची इमारत जुनी झाली असून, मागील काही महिन्यांपूर्वी येथील पीओपीचे प्लास्टरही कोसळले होते. त्यामुळे सध्या या ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी सदरबाजार पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवले जातात.
चंदनझिरा पोलीस ठाण्याचे कामकाज भाडेतत्त्वावरील इमारतीत सुरू आहे. त्यामुळे येथे पोलीस कोठडीची सोय नाही. तर तालुका जालना पोलीस ठाण्याला शासकीय इमारत आहे. मात्र, या इमारतीतही आरोपींसाठी असलेल्या पोलीस कोठडीची सोय नाही. तिन्ही ठिकाणी पोलीस कोठडी नसल्याने सदरबाजार पोलीस ठाण्यातील पोलीस कस्टडीत चारही ठाण्याचे आरोपी ठेवले जातात.
सदर बाजार पोलीस ठाण्याच्या कस्टडीत साधारणत: १५ आरोपी बसू शकतात. मात्र, १५ आरोपी एकाच कस्टडीत ठेवल्यानंतर आरोपींचीही गैरसोय होण्याची शक्यता अधिक असते.
आरोपी ठेवल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याचे कर्मचारी गार्ड ड्युटीवर लावण्यात येतात. त्यांची वैद्यकीय अधिकारी, तपास, न्यायालयात हजर करणे इ. बाबींसाठी मात्र, संबंधित तपासाधिकाºयासह कर्मचाऱ्यांना धावपळ करावी लागते. मागील अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. मात्र, चारही ठाण्यांचे आरोपी एकाच कस्टडीत संभाळताना संबंधितांना डोळ्यात तेल घालून काम करावे लागते.
एकाच वेळी अनेक आरोपी आले तर पोलीस कस्टडीला चक्क कोंडवाड्याचे स्वरूप येण्याची शक्यता असते.
त्यामुळे आरोपी ठेवण्यासाठी सेंट्रल पोलीस कस्टडी किंवा इतर पोलीस ठाण्यातील कस्टडीचा वापर करण्याची गरज आहे.
महिला आरोपींना ठेवायचे कुठे ?
सदर बाजार पोलीस ठाण्यात पुरूष आरोपींना ठेवण्यासाठी कस्टडी आहे. मात्र, महिला आरोपींना ठेवण्यासाठी असलेल्या कस्टडीची दुरवस्था झाली आहे.
महिला आरोपी ताब्यात घेतल्या तर त्यांना ठेवायचे कोठे, असा प्रश्न अधिका-यांसमोर निर्माण होतो. त्यामुळे महिला आरोपींसाठीही कस्टडी तयार करण्याची गरज आहे.