खंडणी मागणारे चौघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 01:02 AM2019-08-14T01:02:01+5:302019-08-14T01:02:35+5:30
सामाजिक वनीकरणच्या वन लागवड अधिकाऱ्याला एक कोटीची खंडणी मागत धमकी देणा-या चौघांना सदरबाजार पोलिसांनी जेरबंद केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सामाजिक वनीकरणच्या वन लागवड अधिकाऱ्याला एक कोटीची खंडणी मागत धमकी देणा-या चौघांना सदरबाजार पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली.
सामाजिक वनिकरणच्या वन लागवड अधिकारी वृषाली बाळकृष्ण तांबे यांनी शुक्रवारी सदरबाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. गत वर्षभरात तुम्ही व अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला असून, आम्हाला एक कोटी रूपये द्या, आमच्या माणसाने बँकेतून परस्पर काढलेल्या पैशाबाबत गुन्हा दाखल करू नका. तुमची नोकरी घालवू शकतो, तुमचे नुकसान व्हायचे नसेल तर गुन्हा दाखल करू नका, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीवरून दिलीप भालचंद्र डोंगरे, रामदास प्रल्हाद दाभाडे, देवानंद दत्तात्रय घायाळ, काशिनाथ मगरे या चौघाविरूध्द सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि संजय देशमुख, पोउपनि योगेश चव्हाण, महिला पोउपनि बनसोडे, पोकॉ भोजणे, काकडे, राठोड, खरात यांनी मंगळवारी दुपारी वरील चौघांना अटक केली. त्यांच्याकडून रोख २७ हजार रूपये, एक कार जप्त करण्यात आली.