विधानसभेसाठी इच्छुकांनी अर्ज भरा, २९ तारखेला कोणाला पाठिंबा देयचा हे सांगू: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 02:03 PM2024-10-21T14:03:33+5:302024-10-21T14:04:41+5:30

लढायचं, समविचारींना पाठिंबा अन् पाडायचंही; तिहेरी सूत्रांमुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचीही चिंता वाढणार

All those who are interested in the assembly should fill the application form, tell us who to support on 29th: Manoj Jarange | विधानसभेसाठी इच्छुकांनी अर्ज भरा, २९ तारखेला कोणाला पाठिंबा देयचा हे सांगू: मनोज जरांगे

विधानसभेसाठी इच्छुकांनी अर्ज भरा, २९ तारखेला कोणाला पाठिंबा देयचा हे सांगू: मनोज जरांगे

वडीगोद्री (जि.जालना) : विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची मोठी घोषणा रविवारी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये केली. मराठ्यांची ताकद असेल त्याठिकाणी उमेदवार देणार, राखीव जागांवर आपल्या विचारांच्या उमेदवाराला पाठिंबा देणार, जिथे ताकद नसेल अशा ठिकाणी आपल्या मागण्या मान्य असल्याचे जो उमेदवार ५०० रुपयांच्या बाँडवर लिहून देईल, त्याला पाठिंबा देणार, अशी तिहेरी सूत्र सांगणारी भूमिका जरांगे पाटील यांनी शेकडो कार्यकर्ते आणि इच्छुकांच्या उपस्थितीत जाहीर केली. तसेच निवडणुकीसाठी मागणी करणारे अनेक जण आहेत. सर्वांनी अर्ज भरावेत. यादरम्यान सर्व बाबींचा अभ्यास केला जाईल आणि २९ तारेखला कोणी अर्ज मागे घ्यायचा हे सांगितलं जाईल.  ज्यांची नावे जाहीर होतील त्यांच्या मागे समाजाने राहावे, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी केले.

जरांगे पाटील यांच्या विधानसभा निवडणूक लढविण्याच्या घोषणेमुळे महायुतीची विशेषत: भाजप आणि विरोधी बाकावर बसणाऱ्या मविआच्या नेत्यांचीही चिंता वाढणार आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगे-सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, दाखल गुन्हे मागे घ्यावेत, यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने मागील दीड वर्षापासून लढा उभा केला आहे. लाेकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर महत्त्वाचा ठरला. या पार्श्वभूमीवर समाजातील राजकीय, सामाजिक, कायदेतज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर लढायचे की पाडायचे याचा निर्णय घेण्यासाठी रविवारी अंतरवाली सराटीत मराठा समाजाची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती.

जिथे आपली ताकद आहे, अशा मतदारसंघात उमेदवार उभे करायचे. आपल्या ताकदीचे गणित पाहणे गरजेचे आहे. समीकरण जुळवणे महत्त्वाचे आहे. मी समीकरण जुळवतोय. नाही जुळले तर अवघड आहे, असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले. एखादी गाडी चांगली असते परंतु, ड्रायव्हर गाडी नीट चालवित नाही आणि ती झाडावर धडकते तशी स्थिती भाजपची आहे. भाजप चांगली आहे, परंतु चालविणारा चांगला नाही, असे म्हणत जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. विविध मुद्द्यांवरून जरांगे-पाटील यांनी या बैठकीत फडणवीस यांच्यावर धारदार टीका केली.
चौकट

कोणी अर्ज मागे घ्यायचा हे २९ तारखेला सांगू
निवडणुकीसाठी मागणी करणारे अनेक जण आहेत. सर्वांनी अर्ज भरावेत. यादरम्यान सर्व बाबींचा अभ्यास केला जाईल आणि २९ तारेखला कोणी अर्ज मागे घ्यायचा हे सांगितलं जाईल. ज्यांची नावे जाहीर होतील त्यांच्या मागे समाजाने राहावे, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी केले. राजकारणात जाण्याची इच्छा नसताना त्यांनी मला यात ओढलं आहे. त्यामुळे समाजाची एकजूट ठेवा.

हात वर करून निर्णय
या बैठकीत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला हात वर करून निवडणुकीमध्ये उमेदवार उतरायचे की नाही, असा प्रश्न विचारला आणि समोरच्या कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले. त्यानंतर जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: All those who are interested in the assembly should fill the application form, tell us who to support on 29th: Manoj Jarange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.