आधीच सिलिंडर हजाराच्या घरात : घरपोचसाठी वेगळी लूट कशाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:35 AM2021-09-15T04:35:07+5:302021-09-15T04:35:07+5:30
जालना : एकीकडे प्रत्येक महिन्याला गॅस सिलिंडरचे दर वाढत असताना दुसरीकडे मात्र प्रत्येक सिलिंडरमागे तीस रुपये अधिकचे डिलिव्हरी चार्जेस ...
जालना : एकीकडे प्रत्येक महिन्याला गॅस सिलिंडरचे दर वाढत असताना दुसरीकडे मात्र प्रत्येक सिलिंडरमागे तीस रुपये अधिकचे डिलिव्हरी चार्जेस घेतले जात आहेत. यातून ग्राहकांची लूट होत नाही.
जिल्ह्यात इंधनाचे दर सतत वाढत आहेत. याबरोबरच स्वयंपाकाचा गॅस महाग होत आहे. वर्षभरात साधारणत: दोनशे रुपयांनी गॅस महागला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत आले आहेत. गॅस दरवाढीबरोबरच गॅस सिलिंडर घरपोच देण्यासाठी अधिकच तीस रुपये घेतले जातात. डिलिव्हरी चार्जेसच्या नावाखाली ही रक्कम घेतली जात आहे. या रकमेची पावतीदेखील संबंधित ग्राहकाला दिली जात नाही. विशेष म्हणजे, एकाही एजन्सीधारकाने ग्राहकाकडून अधिकचे पैसे घेऊ नयेत, असे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले असताना त्याकडे मात्र गॅस एजन्सीधारकांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यामधून संताप व्यक्त होत आहे.
वर्षभरात २०० रुपयांची वाढ
गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच दिवसेंदिवस इंधनाचे दरवाढ आहेत. त्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत. त्यातच मागील वर्षभरात गॅसचे दर २०० रुपयांनी वाढले आहेत. सध्या ९१० रुपयांना गॅस मिळत आहे. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. शासनाने गॅसची दरवाढ कमी करावी, अशी मागणी होत आहे.
डिलिव्हरी बॉयला वेगळे ३० रुपये कशासाठी?
मी गेल्या अनेक दिवसांपासून गॅस वापरते. एजन्सीवर जाऊन गॅस आणण्यासाठी वेळ नसल्याने आम्ही डिलिव्हरी बॉयकडून घेतो; परंतु डिलिव्हरी बॉय आमच्याकडून दरवेळीस ३० रुपये घेतात. त्याची आम्हाला पावतीदेखील मिळत नाही.
-रंजना पवळ, गृहिणी
मी प्रत्येक वेळेस डिलिव्हरी बॉयकडून गॅस घेते. त्यांना ३० रुपये दिले जातात. तीस रुपये दिले नाही तर ते गॅस देत नाहीत. तीस रुपये दिली तरी पावती दिली जात नाही.
-निकिता शेवाळे, गृहिणी
वितरक काय म्हणतात?
ग्राहकांना घरपोच सेवा देण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. डिलिव्हरी बॉयला आम्ही पैसे देतो. डिलिव्हरी बाॅय जर पैसे घेत असतील तर ते त्यांना पैसे देऊ नये, असे परतूर येथील एका एजन्सी चालकाने सांगितले आहे.
आम्ही डिलिव्हरी बॉयला प्रत्येक सिलिंडरचे पैसे देतो; परंतु तरीही ते पैसे घेत असतील तर ते चुकीचे आहे. ग्राहकांनी कुठल्याही डिलिव्हरी बॉयला पैसे देऊ नये, असे एका गॅस एजन्सी चालकाने सांगितले.