अंबड येथे व्यापाऱ्याचे घर फोडून सहा लाखांचा ऐवज लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:18 AM2019-06-14T00:18:40+5:302019-06-14T00:19:10+5:30
शहरातील गोपाल ट्रेडींग कंपनी या होलसेल किराणा दुकानदाराचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्याचे दाग - दागिने आणि रोख रक्कम असा एकुण सहा लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडल्याने अंबड शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
अंबड : शहरातील गोपाल ट्रेडींग कंपनी या होलसेल किराणा दुकानदाराचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्याचे दाग - दागिने आणि रोख रक्कम असा एकुण सहा लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडल्याने अंबड शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
अंबड शहरातील नवीन मोंढा परिसरात राहणारे व्यापारी सोहनलाल लालचंद राठी यांची त्यांच्या घराच्या खालच्या मजल्यावरच गोपाल ट्रेडींग कंपनी या नावाने किराणा दुकान आहे. त्यांच्या घरामध्ये सोहनलाल राठी व त्यांची पत्नी गंगाबाई राठी असे दोघेच राहतात. ते दोघे ११ जूनला सकाळी ११ वाजता घराला कडी - कुलूप लावून खामसवाडी ता.कळंब जि.उस्मानाबाद येथे त्यांच्या नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी गेले होते.
तेथील कार्यक्रम आटोपून ते १२ जूनला अंबड येथे परतले असता, त्यांच्या घरी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच याची माहिती अंबड पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांनी त्यांच्या वरच्या मजल्यावरील घराचे कुलूप तोडून आत प्रेवश करून हा डाव साधला.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक अनिरुध्द नांदेडकर, पो.उप.नि.शैलेश शेजूळ, सुग्रीव चाटे, स.पो.उप.नि.शेळके, जमादार शहाजी पाचारणे, हर्षवर्धन मोरे, के.बी.दाभाडे, वंदन पवार, महेंद्र गायके, संतोष हावळे, गोफणे, खैरकर, गोतीस, देशमुख, संदिप जाधव आदींनी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. अंबडमध्ये राठी यांचे घर फोडून चोरट्यांनी जी दहशत निर्माण केली आहे, त्यामुळे व्यापारी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यवस्तीत चोरट्यांनी ही हिंमत दाखवल्याने पोलिसां समोर आता चोरट्यांचा माग काढण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पोलिसांनी या चोरीची गंभीर दखल घेतली असून, उपविभगीय अधिकारी सी.डी. शेवगण यांनी यात लक्ष घालून तपासाची चक्रे आणखी गतीने फिरवण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. लहान-मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण हे दुष्काळामूळे वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणीही होत आहे.