जालना-जायकवाडी योजनेत अंबड कायमचे भागीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:27 AM2018-01-10T00:27:52+5:302018-01-10T00:27:54+5:30
जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेत अंबड नगर पालिकेस कायमस्वरूपी भागीदार करण्याचा निर्णय झाल्याची महत्त्वपूर्ण घोषणा आ. नारायण कुचे यांनी मंगळवारी पालिकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेत अंबड नगर पालिकेस कायमस्वरूपी भागीदार करण्याचा निर्णय झाल्याची महत्त्वपूर्ण घोषणा आ. नारायण कुचे यांनी मंगळवारी पालिकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत केली. मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अप्पर सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे कुचे यांनी सांगितले.
आ. कुचे म्हणाले की, हक्काच्या पाण्यासाठी अंबड नगरपालिकेला दरमहा १२ लाख रुपये खर्च करावे लागत असल्याने शहरवासियांना दरवर्षी १ कोटी ४४ लाख रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागत होता. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे जायकवाडी-अंबड-जालना पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे नुकसान झाले. या बदल्यात जालना व अंबड नगरपालिकेस नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. नितीन गडकरी यांनी पाईपलाईनच्या नुकसान भरपाईपोटी १२ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या १२ कोटी ३५ लाख रुपयांपैकी जालना व अंबड नगरपालिकेला किती-किती निधी देण्यात यावा, याचा निर्णय घेण्यासाठी सोमवारी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव प्रवीण परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. अंबड नगरपालिकेला जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेत कायमचा भागीदार करावे व अंबड शहराला दररोज ४ एमएलडी पाणीपुरवठा करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. परदेशी यांनी जालना नगरपालिकेने अंबड शहराला योजनेचे कायम भागीदार केल्याचे करारपत्र करावे व त्यानंतरच हा निधी जालना नगरपालिकेला वर्ग करावा, असा निर्णय बैठकीत जाहीर केल्याचे कुचे यांनी सांगितले. उपनगराध्यक्ष केदार कुलकर्णी म्हणाले की, दररोज ४ एमएलडी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पुढील पंधरा ते वीस वर्षे अंबड शहराला पाण्याची समस्या भेडसावणार नाही. यावेळी देविदास कुचे, शेखर मोहरीर, अरुण उपाध्ये, दीपकसिंग ठाकूर, मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे, शहराध्यक्ष संदीप खरात, सभापती गंगाधर वराडे, सौरभ कुलकर्णी, खुर्शिद जिलाणी, अतुल अष्टपुत्रे, जाकेर डावरगावकर, संदीप आंधळे, प्रसाद झाडे, शकील शाह महंमद, नासेर मोहतरम आदींसह नगरसेवक, पदाधिकाºयांची उपस्थिती होती.