अंबड तालुक्यात बिबट्याचा थरार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 03:34 PM2018-05-26T15:34:48+5:302018-05-26T15:34:48+5:30

मागील दहा दिवसापासून तालुक्यात सुरू असलेला बिबटयाचा थरार शुक्रवारी सुध्दा कायम राहिला.

In Ambad taluka, the scare of leopard continued | अंबड तालुक्यात बिबट्याचा थरार कायम

अंबड तालुक्यात बिबट्याचा थरार कायम

Next
ठळक मुद्दे शुक्रवारी पहाटे बिबट्याने पिठोरी सिरसगाव जवळील शोभानगर येथे एका वासराची शिकार केली. शेतकऱ्यांना दररोज आपले पशुधन गमवावे लागत असल्याने शेतकऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.     

अंबड (जालना ) : मागील दहा दिवसापासून तालुक्यात सुरू असलेला बिबटयाचा थरार शुक्रवारी सुध्दा कायम राहिला. शुक्रवारी पहाटे बिबट्याने पिठोरी सिरसगाव जवळील शोभानगर येथे एका वासराची शिकार केली. वनविभागाच्या नियोजनशून्य व गलथान कारभारामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दररोज आपले पशुधन गमवावे लागत असल्याने शेतकऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.     

शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शोभानगर येथील शेतकरी सखाराम काकडे नेहमीप्रमाणे शेतात दूध घेण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांना गोठ्याच्या बाजुला कालवड मृृत अवस्थेत आढळुन आली. बिबट्यानेच कालवडीची शिकार केल्याचे लक्षात येताच परीसरातील शेतकरी आले व त्यांनी याविषयी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. 

वनविभागाचे वनरक्षक ए. डी. तागड, जी. एस. चाटे यांनी काकडे यांच्या शेताची व गोठयाची पाहणी करून पंचनामा केला.
विशेष म्हणजे मागील चार दिवसापासून सखाराम काकडे यांच्या शेताच्या परिसरात बिबट्याचा वावर आहे. गजानन काकडे, शिवाजी काकडे, सखाराम काकडे, गणेश काकडे, गणेश मारेकर, मंदा काकडे यांनी प्रत्यक्ष बिबट्या पाहिल्याचे सांगितले. याविषयी काकडे कुटुंबियांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती सुद्धा दिली होती. परंतु, वनविभागाचा एकही अधिकारी, कर्मचारी शेताकडे पाहणीसाठी फिरकले नाही.

वडीगोद्री, धाकलगांव, शोभानगर, डावरगांव व अंबड शिवारात बिबट्याची दहशत कायम आहे. बिबट्याने आतापर्यंत तीन गायींचे वासरु, एक पाळीव कुत्रा यांची शिकार केली आहे तर दोन वासरांवर हल्ला करुन त्यांना जखमी केले आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अद्यापपर्यंत तरी यश आलेले नाही. काही युवकांकडून शेतात रात्रभर पहारा देण्यात येत आहे. तर परिसरातील पशुपालक धास्तावले आहेत. 

दहा दिवसानंतर वनविभागाला जाग
शुक्रवारी बिबट्याला पकडण्यासाठी शोभानगर येथे पिंजरा लावण्यात आल्याची माहीती वनरक्षक ए. डी. तागड यांनी दिली.
 

Web Title: In Ambad taluka, the scare of leopard continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.