अंबड शहराला पाणी देणार नाही -संगीता गोरंट्याल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 01:03 AM2018-04-15T01:03:17+5:302018-04-15T01:03:17+5:30
दररोज सहा एमएलडी पाणी अंबड पालिकेला मिळवण्याचा आ. नारायण कुचे यांचा प्रयत्न आहे. जालनेकरांवर हा अन्याय असून, याविरोधात आपण मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : युडीआयच्या विशेष योजनेतून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जालना पालिकेच्या आर्थिक सहभागातून जायकवाडी -जालना ही नवीन जलवाहिनी योजना राबविण्यात आली. मात्र, सत्तेचा गैरवापर करुन या योजनेवर हक्क सांगत तब्बल दहा टक्के म्हणजेच दररोज सहा एमएलडी पाणी अंबड पालिकेला मिळवण्याचा आ. नारायण कुचे यांचा प्रयत्न आहे. जालनेकरांवर हा अन्याय असून, याविरोधात आपण मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
नगराध्यक्षा गोरंट्याल म्हणाल्या की, जालना शहर व परिसरात ड्रायपोर्ट, आयसीटी, सिडको वसाहत या व अन्य प्रस्तावित विकास प्रकल्पांमुळे पाण्याची गरज मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. सध्या शहराची ८० एमएलडी पाण्याची गरज असताना ६० एमएलडी पाण्यावर भागवावे लागत आहे. त्यातच अंतर्गत जलवाहिनी अंथरण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर व विविध ठिकाणचे जलकुंभ उभारणीनंतर नियोजनबद्ध वितरणासाठी पाण्याची गरज वाढणार आहे. मलनिस्सारण प्रकल्पही लवकरच सुरु होणार आहे. यामुळे आगामी काळात जालना शहर व परिसराचीच पाण्याची गरज अधिक राहील. त्यातच अंबड पालिकेच्यावतीने आ. नारायण कुचे यांनी या योजनेवर अंबड पालिकेचा हिस्सा दाखवत दररोज तब्बल सहा एमएलडी पाण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. सध्या अंबड पालिकेला अडीच एमएलडी पाणी दिले जात आहे.
जालन्याच्या हिश्श्याचे पाणी अंबड पालिकेने पळवले तर शहरावर पुन्हा एक महिना अंतराने पाणी पुरवठा करण्याची वेळ येण्याची भिती माजी आ. गोरंट्याल यांनी व्यक्त केली. २०१२ मध्ये जशी स्थिती होती तीच पुन्हा निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. जालनेकरांच्या हितासाठी लोकप्रतिनिधींनी याप्रश्नी सहकार्य करुन शहराच्या हिश्श्याचे इतरांना घेऊ देऊ नये, अशी अपेक्षाही माजी आ. गोरंट्याल यांनी व्यक्त केली.