आंबेडकरांना अपेक्षित लोकशाही अजून रुजलीच नाही- मिटकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:13 AM2019-04-11T00:13:25+5:302019-04-11T00:14:05+5:30
आपलं मत म्हणजे चोवीस कॅरेट सोनं आहे, ते विकू नका, असे प्रतिपादन व्याख्याते अमोल मिटकरी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जातीची उतरंड आजही जशास तशीच आहे. सत्तेच्या दलालांनी तुम्हा- आम्हाला फुले-शाहू- आंबेडकर कळूच दिले नाहीत. आजही ही मंडळी आपला वापर केवळ त्यांच्या सत्तेसाठीच वापरुन घेत आहेत. त्यासाठी जागे व्हा! डॉ. आंबेडकरांना अपेक्षित लोकशाही का रुजली नाही? तर आजही आम्ही खऱ्या अर्थाने जागे झालेलो नाहीत. म्हणूनच जागे व्हावा आणि बाबासाहेबांनी दिलेल्या मतदानाचा हक्क इमाने - इतबारे बजवा. आपलं मत म्हणजे चोवीस कॅरेट सोनं आहे, ते विकू नका, असे प्रतिपादन व्याख्याते अमोल मिटकरी यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना मिटकरी बोलत होते. यावेळी विचारपीठावर अॅड. ब्रह्मानंद चव्हाण, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, सहायक पोलीस निरीक्षक पल्लवी जाधव, सुधाकर रत्नपारखे, अध्यक्ष अरुण मगरे, सचिव सुहास साळवे यांची उपस्थिती होती. बाबासाहेबांनी कोणा एका धर्मासाठी, कोणा एका जातीसाठी नव्हे तर तमाम मानवतावादी दृष्टीकोन ठेवून घटनेची निर्मीती केली. मात्र, संधीसाधूंना बाबासाहेबांचे हे कार्य रुचले नाही, म्हणून त्यांनी ज्या- ज्या प्रकारे त्यांचा छळ करता येईल, ती सर्व नीती वापरुन त्यांना मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. जगाच्या पाठीवर भारताची राज्य घटना एकमेव अशी आहे की, जी केवळ आणि केवळ मानव जातीला समर्पित आहे. म्हणूनच बाबासाहेबांचे विदेशात सत्कार झाले. परंतु त्यांना हाच सन्मान देशात मिळाला नाही. उलट ते जेथे बसले ती जागा गोमूत्राने धुवून काढण्यात आली इतकी कूटनीती इथल्या धर्मियांनी खेळली. माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं असून, ते कोणीही हिरावू शकत नाही. बाबासाहेबांनी घटना लिहीतांना अगदी बारीक- सारीक गोष्टींचा विचार केलेला आहे. लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम हे लोकांचं असून ते जर का त्यांनी इमाने - इतबारे केलं नाही तर उद्भवणाऱ्या परिस्थितीला तेच कारणीभूत ठरतील, असं बाबासाहेब त्यावेळी म्हणाले होते. म्हणूनच जागे व्हा ! बाबासाहेबांना अपेक्षित अशी लोकशाही आजही का रुजली नाही तर त्याला आपणच कारणीभूत आहोत!
मतदान म्हणजे २४ कॅरेटचे
सोने ते विकू नका
कोणाला पाडायचे आणि कोणाला सत्तेत ठेवायचे हे मतदारांना घटनेने दिलेल्या मतदानाच्या हक्कातून सर्वसामान्य जनता ठरवू शकते यामुळे कितीही आमिष आले तरी आपले अमूल्य सोन्यासारखे मत विकू नका. कोणाला मतदान करायचे ते तुम्हीच ठरवा, मात्र मत विकून लाचार होऊ नका.कारण रक्तपाताशिवाय रुजणारी लोकशाही बाबासाहेबांना अभिप्रेत होती, हे विसरु नका, असेही शेवटी मिटकरी यांनी सांगितले.