गुत्तेदारांच्या खात्यात जमा होणार आॅनलाईन रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 01:18 IST2019-12-13T01:18:32+5:302019-12-13T01:18:35+5:30
जिल्हा परिषदेमध्ये मागील काही महिन्यापासून चेक चोरी जाण्याचे प्रकार घडत आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी जि.प. प्रशासनाने पुढाकार घेतला

गुत्तेदारांच्या खात्यात जमा होणार आॅनलाईन रक्कम
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्हा परिषदेमध्ये मागील काही महिन्यापासून चेक चोरी जाण्याचे प्रकार घडत आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी जि.प. प्रशासनाने पुढाकार घेतला असून, आता गुत्तेदारांची देयके व सर्वं पंचायत समिती विभागांच्या कर्मचाऱ्याचे वेतन सीएमपी प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे थेट गुत्तेदारांच्या खात्यात देयके बिलाची रक्कम जमा होणार आहे.
काही महिन्यांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातून चार चेक चोरीला गेले होते. यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतांनाच उप अभियंता पंकज चौधरी यांनी कर्मचाऱ्यांचे लाखो रूपये लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला. यामुळे प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला.
परंतु, या दोन्ही घटनानंतर जि.प. प्रशासनाने कडक पावले उचली असून, अशा घटना न होण्यासाठी गुत्तेदारांचे देयके थेट त्यांच्या खात्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. गुत्तेदारांबरोबरच लाभार्थी व पंचायत समिती विभागातील कर्मचा-यांचे वेतनही सीएमपी प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.
वित्त विभागातर्फे ठेकेदार, लाभार्थी व कर्मचा-यांना देयक मंजुरीनंतर धनादेशाद्वारे रक्कम अदा करण्याची पद्धत बंद करून सीएमपी प्रणालीचा स्वीकार करण्यात आला आहे. सदर रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. यामुळे आता धनादेश वाटप प्रक्रिया बाद होणार असून धनादेश वटण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. सदर रक्कम लाभार्थी किंवा संबंधितांना लगेच मिळणार आहे. सीएमपी प्रणालीचे विविध फायदे लक्षात घेता वित्त विभागाच्या धर्तीवर सर्व विभाग व पंचायत समित्यांना सीएमपी प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत जिल्हा परिषदस्तरावर सर्व विभाग प्रमुखांना व पंचायत समिती स्तरावरील सर्व गटविकास अधिकाºयांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
तसेच त्यांच्या अधिनस्त रोखपाल शाखेच्या कर्मचाºयांना सीएमपी प्रणालीचे प्रशिक्षणही देण्यात येणार असल्याची माहिती वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना दिली.
कर्मचा-यांना सोमवारी प्रशिक्षण
सीएमपी प्रणालीची माहिती होण्यासाठी १६ डिसेंबर रोजी सर्व कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांनी दिली आहे.
यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी पत्र काढून सर्व विभागप्रमुख व गटविकास अधिकाºयांना कळविले आहे. तसेच त्यांनी सर्वांनी प्रशिक्षणास उपस्थित राहण्याचे आदेशही दिले आहेत. दरम्यान, यामुळे चेक चोरी जाण्याचे प्रकार थांबतील, असा दावा जि.प. प्रशासनाने केला आहे.