१७२५ केंद्रांवर २ लाख २७ हजार बालकांना दिली पोलिओची मात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 01:18 IST2020-01-20T01:17:34+5:302020-01-20T01:18:23+5:30
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २०२० अंतर्गत रविवारी जिल्हाभरात पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली.

१७२५ केंद्रांवर २ लाख २७ हजार बालकांना दिली पोलिओची मात्रा
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २०२० अंतर्गत रविवारी जिल्हाभरात पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील १७२५ केंद्रांवर जवळपास ४ हजार ६८६ कर्मचाऱ्यांमार्फत २ लाख २७ हजार ५२ बालकांना पोलिओची मात्रा देण्यात आली. आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते शासकीय महिला रूग्णालयातील बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजून राज्यस्तरीय मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, आ. कैलास गोरंट्याल, जि.प. अध्यक्ष उत्तम वानखेडे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, उपसंचालक डॉ. स्वप्नील काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, राजेंद्र पाटील, बालसंगोपन अधिकारी संतोष कडले आदींची उपस्थिती होती.
रविवारी जिल्हाभरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील २ लाख ४९ हजार ७३५ बालकांना डोस देण्यासाठी १७२५ केंद्र तयार करण्यात आले होते. २ हजार कर्मचारी, ११७ मोबाईल टीम, १२०० ट्रान्झिट टीम, ३१० पर्यवेक्षक, १२ जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी जवळपास २ लाख २७ हजार ५२ बालकांना पोलिओची मात्रा दिली. दिवसभरात १७२५ केंद्रावर जवळपास दोन लाख २७ हजार बालकांना पोलिओची मात्रा देण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.