जळगावात ही सिस्टीम ‘ब्रेक’करण्याचा प्रयत्न उघड
By अमित महाबळ | Published: October 1, 2022 04:36 PM2022-10-01T16:36:31+5:302022-10-01T16:37:22+5:30
Jalgaon: बुधवारी, तपासणीवेळी दिव्यांग असल्याचे भासविणारे पाच जण सापडले आहेत. त्यांच्यावर कारवाई झालेली नसली, तरी मंडळाचे प्रशासन अधिक सावध झाले आहे.
- अमित महाबळ
जळगाव - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दिव्यांग मंडळाची कार्यप्रणाली मोडीत काढण्याचा प्रयत्न होत असल्याचे उघड झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून टोकनवर संशयास्पदरितीने केलेली खाडाखोड, कर्मचाऱ्यांना आमिषे दाखविणे यासारख्या घटना उघड होत असतानाच बुधवारी, तपासणीवेळी दिव्यांग असल्याचे भासविणारे पाच जण सापडले आहेत. त्यांच्यावर कारवाई झालेली नसली, तरी मंडळाचे प्रशासन अधिक सावध झाले आहे.
कोविडसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अधिग्रहित करण्यात आले होते. गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या शेवटी ते नॉन कोविड करण्यात आल्यानंतर २८ जुलैपासून दिव्यांग मंडळाचे कामकाज पूर्ववत सुरू झाले. मात्र, तपासणीसाठी येणाऱ्या दिव्यांगांची एकाच दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी ४ ऑगस्टपासून कूपन प्रणाली सुरू करण्यात आली. यामुळे एजंटांना चाप बसला. त्यांनी उभी केलेली समांतर व्यवस्था मोडीत निघाली. गैरव्यवहार थांबले. या दरम्यान कूपन प्रणाली बंद करा म्हणून काही संघटनांनी प्रयत्न देखील केले होते. त्याला प्रशासनाने दाद दिली नाही.
प्रयत्न हाणून पाडले
कूपनवर दिव्यांग व्यक्तीचे नाव व इतर माहिती लिहिलेली असते. त्यामध्ये खाडाखोड केली असल्याचे यापूर्वी आढळून आले होते. तसेच कर्मचाऱ्यांना आमिषे दाखविण्याचे प्रकार घडले होते. मात्र, बुधवारच्या तपासणीवेळी धक्कादायक प्रकार उघड झाला. पाच व्यक्तींनी दिव्यांग असल्याचा बनाव केला होता. वैद्यकीय तपासणीवेळी ही बाब समोर आली.
अर्ज ऑनलाइन, त्याचा घेतला जातो गैरफायदा
तपासणीसाठी अर्ज ऑनलाइन करायचा असतो. या संकेतस्थळावर नियंत्रण सरकारचे आहे. दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याची कार्यवाही दिव्यांग मंडळ करते. याचाही गैरफायदा काही जण घेत आहेत. याआधी एक व्यक्ती दिव्यांग असल्याचे भासवत दिव्यांग मंडळात आली होती. या व्यक्तीने चालण्यासाठी कुबड्यांचा आधार घेतला होता मात्र, घाईगडबडीत परत जाताना चक्क कुबड्या विसरून गेली होती.
अज्ञानातून लाभ घेण्याचा प्रयत्न
काही प्रकरणे अशीही समोर आली आहेत, की सरकारी योजनेचा लाभ मिळेल म्हणून किरकोळ दुखापतींमुळे दिव्यांगत्व आले आहे, असे दाखण्याचे प्रयत्न अज्ञानातून करण्यात आले होते. चुकीचे सल्ले देणाऱ्या व्यक्तींमुळे अशा घटना घडत आहेत. वैद्यकीय तपासणीत या गोष्टींना चाप बसतो.
दिव्यांग मंडळाच्या अध्यक्षांचे आवाहन
एजंट किंवा अन्य एखादी व्यक्ती पैसे घेऊन दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र मिळवून देण्याचे आमिष दाखवत असेल, तसेच काही गैरप्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यास दिव्यांग मंडळात किंवा अधिष्ठाता कार्यालयात संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारुती पोटे यांनी केले आहे.