अन् विद्यार्थी लैंगिक शिक्षणावर बोलू लागले; जालन्यातील जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम
By महेश गायकवाड | Published: August 6, 2022 06:46 PM2022-08-06T18:46:30+5:302022-08-06T18:47:01+5:30
किशोरवयीन मुला-मुलींमध्ये वयोमानानुसार होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलाविषयी त्यांना वेळीच माहिती देणे आवश्यक बनले आहे.
जालना: शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक विकासासाठी लैंगिक शिक्षण देणे काळाची गरज बनली आहे. परंतु, लैंगिक शिक्षणावर बोलायचे कसं, आपल्या मुलांशी त्यावर बोलण्यासाठी पालकांचीच मानसिक तयारी होत नाही. म्हणून इंदेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा चाटुफळे यांनी आपल्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी महिन्यातून एक दिवस शारीरिक व मानसिक विकास या विषयावर विशेष वर्ग भरवत आहे. त्यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे शाळेतील मुले-मुली आता लैंगिक समस्या आणि प्रश्नांवर मनमोकळ्यापणाने शिक्षकांशी बोलू लागली आहे.
किशोरवयीन मुला-मुलींमध्ये वयोमानानुसार होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलाविषयी त्यांना वेळीच माहिती देणे आवश्यक बनले आहे. परंतु, याकडे समाज नकारात्मकदृष्टीने बघत आलेला आहे. त्यामुळे किशोर वयात मुलींच्या शरीरात होणाऱ्या बदलांमुळे त्यांच्या नैराश्य आणि न्यूनगंड तयार होतात. यावर वेळीच मार्गदर्शन करण्यासाठी मुख्याध्यापिका वर्षा चाटुफळे दर महिन्याला विशेष वर्गाचे आयोजन करून शारीरिक व मानसिक बदलांवर विद्यार्थ्यांशी मनमोकळ्यापद्धतीने संवादातून मार्गदर्शन करत आहे. या विशेष वर्गात लैंगिक शिक्षण, मासिक पाळी, ताण तणावाचे व्यवस्थापन आदी विषयावर मुलामुलींना मुख्याध्यापिका चाटुफळे मार्गदर्शन करतात. मासिक पाळी सुरू झालेल्या मुलींना त्या स्वखर्चातून सॅनिटरी पॅडही वाटप करत आहेत. शाळेतील विशेष वर्गात विद्यार्थी आपल्या मनातील विविध प्रश्न आणि शंका आपल्या शिक्षकांसमोर मांडत असून, शिक्षक सोप्या भाषेत त्याचे निरसन करत आहेत. या उपक्रमामुळे भविष्यात विद्यार्थ्यांसमोर येणाऱ्या प्रश्न आणि समस्यांची जाणीव त्यांनी आधीच होत असल्याने त्यांच्यातील भीती दूर होण्याास मदत होत आहे. शाळेतील मुली शिक्षिकांसोबत मासिक पाळीबाबत मनमोकळ्या पद्धतीने बोलत आहेत.
जनजागृती होणे गरजेचे
लैंगिक शिक्षणात केवळ शरीराच्या भागाची माहिती देऊन जागृती होत नाही. वयानुसार शरीरिक आणि भावनिक बदल होत असतात. मुलांना त्यांच्याशी जुळवून घ्यायला शिकवण्याचा प्रयत्न मी करत आहे. सध्याच्या युगात मुलांमधील भावभावनांच्या आंदोलनांना ओळखून वेळीच त्या संयमित करायला शिकवणे गरजेचे आहे. समाजात मासिक पाळीबाबत चुकीच्या प्रथा पाळल्या जातात. त्याबद्दल जनजागृती होणे गरजेचे आहे.
- वर्षा चाटुफळे, मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद शाळा इंदेवाडी