... अन् केंद्रीय मंत्री दानवे आल्यावर हलली यंत्रणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 12:47 AM2019-10-08T00:47:44+5:302019-10-08T00:48:23+5:30
रूग्णवाहिका नसल्याने अडचण निर्माण झाली होती. याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना प्रसुती झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी दिल्यावर ते थेट सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास रूग्णालयात हजर झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : एका महिलेच्या प्रसुतीनंतर तिच्यासह दोन जुळ्या मुलांची प्रकृती चिंताजनक झाली होती. या तिघांना अधिक उपचारासाठी जालन्याला हलविणे आवश्यक होते. परंतु, रूग्णवाहिका नसल्याने अडचण निर्माण झाली होती. याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना प्रसुती झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी दिल्यावर ते थेट सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास रूग्णालयात हजर झाले.
विद्या पंढरीनाथ भावले (रा.सिल्लोड ह.मु. हसनाबाद) या २६ वर्षे वयाच्या महिलेला प्रसुतीसाठी तिच्या माहेरच्यांनी भोकरदन येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते. विद्या भावले यांनी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. परंतु, आईसह मुलांच्या शरीरात आवश्यकतेपेक्षा हिमोग्लोबीनची कमतरता असल्याने तिघांची प्रकृती चिंताजनक झाली होती. या रूग्णालयात कृत्रिम श्वासोच्छवास देण्याची व्यवस्था नसल्याने त्यांना वैद्यकीय अधिकारी मयुरी मंगरूळकर यांनी सांगितले. यावर नातेवाईकांनी १०८ या क्रमांकावर संपर्क साधून रूग्णवाहिकेची मागणी केली. परंतु, रूग्णवाहिका नसल्याचे सांगण्यात आले. याची माहिती दानवेंनाही देण्यात आली. त्यांनी थेट रूग्णालय गाठून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल मुळे यांना सूचना देऊन तातडीने रूग्णवाहिकेची व्यवस्था करून आईसह त्या मुलांना जालना येथे हलविले. यावेळी तहसीलदार संतोष गोरड यांची उपस्थिती होती.