संतप्त ग्रामस्थांनी वीजकेंद्र पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 01:08 AM2019-01-30T01:08:50+5:302019-01-30T01:09:05+5:30
कुंभार पिंपळगाव येथील दोन महिन्यात पाच रोहित्र जळालेले आहेत. असे असताना विजवितरणकडून रोहित्र देण्यास टाळाटाळ करत असल्याने मंगळवारी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर ३८ गावाला वीजपुरवठा बंद पाडला त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : कुंभार पिंपळगाव येथील दोन महिन्यात पाच रोहित्र जळालेले आहेत. असे असताना विजवितरणकडून रोहित्र देण्यास टाळाटाळ करत असल्याने मंगळवारी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर ३८ गावाला वीजपुरवठा बंद पाडला त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
कुंंभारपिंपळगाव येथे दोन महिन्यांपासून विजेची समस्या भेडसावत होती, त्यातच वीजवितरण कडून रोहित्र देण्यास विलंब लागत असल्याने नागरिक व व्यापाऱ्यांची मोठी अडचण होत होती. वारंवार मागणीकरूनही रोहित्र मिळत नसल्याने दिवाळीही अंधारात साजरी करावी लागली होती. गाव अंधारात असतानाही काहींना अव्वा चे सव्वा वीजबिले आल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत मंगळवारी सकाळी वीज उपकेंद्र बंद पाडले. यात व्यापारी महासंघ , ग्रामविकास युवामंचसह सरपंच, उपसरपंच सहभागी झाले होते. अभियंता एम डी निमजे यांना उपस्थितांनी चांगलेच धारेवर धरले होते.
आंदोलनाला यश, तात्काळ रोहित्र दिले
व्यापारी व ग्रामस्थांनी मिळून मंगळवारी नवीन रोहित्रासाठी उपकेंद्र बंद करून उपोषणाला सुरुवात केली. दरम्यान उपअभियंता एम. डी. निमजे यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करत परतूर येथून चार रोहित्रे तात्काळ दिल्याने अखेर ग्रामस्थांनी हे आंदोलन मागे घेतले.