संतप्त महिलांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:59 AM2019-01-28T00:59:16+5:302019-01-28T00:59:31+5:30
ग्रामपंचायत कार्यालयाने वेळेच्या आधीच महिलांच्या धसक्याने घाईगडबडीत ग्रामसभा आटोपती घेतली. यामुळे संतप्त झालेल्या दीडशे महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला शनिवारी टाळे ठोकले
लोकमत न्यूज नेटवर्क
आंबा : येथील ग्रामपंचायत कार्यालयाने वेळेच्या आधीच महिलांच्या धसक्याने घाईगडबडीत ग्रामसभा आटोपती घेतली. यामुळे संतप्त झालेल्या दीडशे महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला शनिवारी टाळे ठोकले. ग्रामसभेत सहभागी होऊ न देणे हा तर आमच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणली जात आहे. असा आरोप करत महिलांनी दोन तास ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. परतूर तालुक्यातील सर्वात मोठी आंबा ग्रामपंचायत आहे.
ग्रामपंचायत कार्यालयाने शुक्रवारी गावामध्ये दवंडी देऊन शनिवारी सकाळी ९ ते १० या वेळेत ग्रामसभा होणार असून यात ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते. त्यामुळे शासन दरबारी विविध मागण्या मांडण्यासाठी १०० ते १५० महिलांनी ९ : १५ वाजता ग्रामपंचायत कार्यालय गाठले, यावेळी ग्रामसभा संपली असल्याचे ग्रामविकास अधिकारी नामदेव काळे यांनी त्यांना सांगितले.
यानंतर विविध मागण्यांवर चर्चा करण्याआधीच ग्रामसभा कशी संपली. असा सवाल महिलांनी उपस्थित केला असता त्यांना उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली, असा आरोप गावातील लता काळदाते यांनी केला आहे.
याबाबत ग्रामविकास अधिकारी नामदेव काळे म्हणाले, सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी ग्रामसभेला सुरूवात झाली, सर्व विषय चर्चिल्यानंतर १०.१५ वाजता ही ग्रामसभा संपली. यानंतर सर्वांची संमती घेऊन सरपंच घरी गेल्यावर मी परतूरला आलो. असे ते म्हणाले.
ग्रामसभेला आम्ही येणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी, सरपंचांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक ग्रामसभा आटोपती घेतली. यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.