अंजली दमानिया यांना दिलासा, न्यायालयाकडून जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 09:50 PM2017-11-18T21:50:25+5:302017-11-18T22:07:49+5:30
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शनिवारी परतूर न्यायालात हजेरी लावली. न्याययालयाने त्यांना वैयक्तिक बंधपत्रावर जामीन मंजूर केला. बागेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजी जाधव यांनी दमानिया यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.
परतूर (जालना) : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शनिवारी परतूर न्यायालात हजेरी लावली. न्याययालयाने त्यांना वैयक्तिक बंधपत्रावर जामीन मंजूर केला. बागेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजी जाधव यांनी दमानिया यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.
दमानिया यांनी बागेश्वरी कारखान्यासचे चेअरमन शिवाजीराव जाधव व त्यांच्या काही संस्थावर आरोप केले होते. यामध्ये श्रद्धा एनर्जीचे सीएमडी यांनी दहा हजार एकर जमीन खरेदीसाठी पैसा कोठून आणला. तसेच काही सिंचन प्रकल्पात घोटाळा झाल्याचे आरोप, श्रद्धा कंपनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची असून, ती शिवाजी जाधव चलवत आहेत. सिंचन प्रकल्पाच्या ठेकेदारीतून चेअरमन जाधव यांनी जळगावचा मुक्ताई कारखाना घेतला, अशा प्रकारचे हे आरोप आहेत.
विविध वृत्तपत्र व वाहिन्यांना याबाबत माहिती देऊन चेअरमन शिवाजी जाधव व त्यांच्या संस्थाची बदनामी केल्या प्रकरणी परतूर येथे १९ आक्टोबर २०१६ रोजी अंजली दमानीया यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती. या प्रकरणात शनिवारी न्यायालयाच्या नोटिसीनुसार दमानिया सकाळी अकरा वाजता परतूर न्यायालयात हजर झाल्या. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
फौजदारी गुन्हा नोंदवणार आहे- दमानिया
न्यायालयात उपस्थित पत्रकारांशी दमानिया यांनी चर्चा केली. श्रद्धा एनर्जी ग्रुपने संकेतस्थळावरील दहा हजार एकर जमिनीचा उल्लेख काढून टाकला आहे. त्याचे आपल्याकडे पुरावे आहेत. याप्रकरणी आपण फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत. मी अभ्यासपूर्ण बोलत असून, केलेल्या आरोपावर ठाम आहे. हा खटला परतूर ऐवजी जळगाव किंवा इतरत्र दाखल करायला हवा होता. केवळ मला त्रास देण्यासाठी हा खटला परतूरला दाखल करण्यात आला. आपण हे प्रकरण शेवटपर्यंत लढत राहणार असल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले.
आरोपात तथ्य नाही- जाधव
बागेश्वरीचे चेअरमन शिवाजीराव जाधव म्हणाले की, अंजली दमानिया यांनी केलेल्या खोट्या आरोंपामुळे आमच्या संस्थांची बदनामी झाली. बँकानी आम्हाला कर्ज नाकारले. दमानिया यांनी केलेल्या आरोपात काही तथ्य नाही. संकेत स्थळावरील माहिती आमची आहे. काढली काय, आणि ठेवली काय, शेतक-यांच्या दहा हजार एकरवर आम्ही ठिबक केले. जमीन आमची नाही. शेवटपर्यंत खटला हा लढू.