अन्नामृतच्या आहार प्रकल्पाचा आज लोकार्पण सोहळा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 12:59 AM2020-02-05T00:59:44+5:302020-02-05T01:01:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कोणताही विद्यार्थी उपाशी राहू नये या उदार भावनेतून डॉ. राधाकृष्ण दास यांनी २००४ मध्ये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कोणताही विद्यार्थी उपाशी राहू नये या उदार भावनेतून डॉ. राधाकृष्ण दास यांनी २००४ मध्ये मुंबई येथे सुरु केलेल्या अन्नामृत फाऊंडेशनच्या जालना येथील प्रकल्पाच्या केंद्रीय स्वयंपाक गृहाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी दुपारी दीड वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
अन्नामृत फाऊंडेशनच्या जालना शाखेची स्थापना १७ जून २०२० रोजी झाली असून, गत काही महिन्यांपासून ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू होती. विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचा उत्तम असा प्रतिसाद या योजनेस मिळत असल्याने याचा विस्तार करण्याचे संस्थेने ठरविले आहे. गरजूंना आरोग्यदायी पौष्टिक आहार देऊन भूक आणि कुपोषण कमी करण्याचे ध्येय समोर ठेवून जालना जिल्ह्यातील अनेक शाळांत हा उपक्रम राबविला जात आहे.
अन्नामृत फाऊंडेशन जिल्हा परिषद, नगर परिषद, अनुदानित शाळा इत्यादीमध्ये शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन योजने अंतर्गत येणा-या शालेय पोषण आहाराचे वितरण करते. जालना शहरामधील राष्ट्रीय हिंदी विद्यालय - प्राथमिक व माध्यमिक, दानकुंवर हिंदी विद्यालय -प्राथमिक व माध्यमिक, सरस्वती भुवन विद्यालय, मत्सोदरी विद्यालय अशा विविध सात शाळांमध्ये शिकणा-या ७ हजार विद्यार्थ्यांसाठी सेवा देत आहे. मुकेश अग्रवाल, अनिल टेकाळे, डॉ. संतोष मद्रेवार, सुनील रायठठ्ठा, रासगोविंद दास, अनया अग्रवाल, सुदर्शन पोटभरे, गणेश नखाते अन्नामृत जालना समितीचे आदी सदस्य या प्रकल्पाचे कामकाज पाहतात.
अन्नामृतच्या डॉ.बद्रीनारायण बारवले केंद्रीय स्वयंपाकगृहाचे बांधकाम पूर्ण झाले असून ५० हजार विद्यार्थ्यांना सेवा देण्यास सक्षम असा प्रकल्प जालना शहरात सज्ज झाला आहे. सुमारे ४० हजार चौरस फूट जागेवर १२ हजार चौरस फूटांचे मुख्य इमारतीचे बांधकाम करण्यात आलेले आहे. जालना तसेच जवळील ३० ते ३५ कि.मी. अंतरावरील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद, नगर परिषद तसेच अनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांना सेवा देण्याचे कार्य या प्रकल्पाच्या माध्यमातून होत असल्याची माहिती व्यवस्थापकांनी दिली. मंगळवारी दुपारी २ वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणा-या या लोकार्पण सोहळ्यास आरोग्यमंंंत्री राजेश टोपे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, सिमोन थोरस्टेड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तम वानखेडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेंद्र पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती राहणार आहे.
सन २००४ मध्ये ९०० विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेला हा प्रकल्प सध्या १२ लाख विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरविण्याचे काम करीत आहे. विविध ८ राज्यांमध्ये २१ अत्याधुनिक केंद्रीय स्वयंपाकगृहे निर्माण करण्यात आली आहेत. अन्नामृत फाऊंडेशनच्या राष्ट्रीय स्तरावरील समिती सदस्य कुशल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. राधाकृष्ण दास यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाचे कामकाज चालते.
अन्नामृत
अन्नामृत फाऊंडेशनच्या जालना प्रकल्पाच्या निर्मितीसाठी महिको मोन्सॅन्टो बायोटेक (इंडिया) ने ६ कोटींचा निधी सामाजिक दायित्व निधीतून दिला असून गोल्डन ज्युबिली एज्युकेशनल सोसायटीची ४० हजार चौरस फूट जागा वार्षिक एक रु पया भाडेतत्त्वावर या प्रकल्पासाठी देण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले.