आणखी एक धरण धोकादायक स्थितीत ? भोकरदनमधील धामना धरणाच्या सांडव्यातून पाणी गळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 12:46 PM2019-07-03T12:46:30+5:302019-07-03T12:46:54+5:30
पाणी गळतीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने धरण परिसरात भीतीचे वातावरण
भोकरदन (जालना ) : भोकरदन तालुक्यातील शेलुद येथील धामना धरणाच्या सांडव्याला पडलेल्या भेगातून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने परिसरात धरण फुटण्याची चर्चेने जोर धरला आहे. धरणाच्या खालील भागातील शेलुद, लेहा, पारध खु, पारध बु व बुलढाणा जिल्यातील म्हसला या गावाला याचा धोका असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांत जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे जुई व धामना धरणात चांगला पाणी साठा आला आहे मात्र 2 जुलै रोजी या दोन्ही धरणाच्या वरच्या भागात धुव्वाधार पाऊस झाला त्यामुळे ही दोन्ही धरणे 85 टक्के भरली आहेत मात्र धामना धरणाच्या सांडव्यापर्यंत पाणी आले व रात्री पासूनच सांडव्याच्या खालच्या बाजूस पडलेल्या बोगद्यातून 5 ते 6 ठिकणातून मोठ्याप्रमाणात पाणी वाहून जात आहे. त्यामुळे या परिसरात धरण फुटण्याची चर्चा सुरू झाली व नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. खालच्या बाजूस असलेल्या काही गावात खबरदारीसाठी दवंडी देण्यात आली असल्याची माहिती आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हाअधिकारी रवींद्र बिनवडे, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, तहसीलदार संतोष गोरड, कनिष्ठ अभियंता एस जि राठोड आदी अधिकारी धरणाच्या पाहणीसाठी निघाले आहेत.
डागडुजीकडे दुर्लक्ष
धामना धारण 1972 साली पूर्ण झाले आऊन या धरणाची पाणी साठवण क्षमता10.72 द.ल.घ. मी एवढी आहे धरणात सध्या 9.2 द.ल.घ.मी पाणी साठा आहे. या धरणामुळे जवळपास 1 हजार 788 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. मात्र 2013 पासून धरण भरले नसल्याने पाटबंधारे विभागाचे याच्या डागडुजीकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले आहे.
धरण फुटण्याची शक्यता नाही
कनिष्ठ अभियंता एस जि राठोड यांनी सांगितले की, नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण, धरणात जर पाणीसाठा जास्त झाला तर तो सांडव्यातून नदीपात्रात सोडण्यात येतो. त्यामुळे धरण फुटण्याची शक्यता मुळीच नाही. सांडव्याच्या भिंतीला काही ठिकाणी पडलेल्या भेगातून पाणी गळती सुरु आहे. गळती बंद करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे. ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास न ठेवू नये.