अंतरवाली सराटी बनलेय राजकीय आखाड्याचे केंद्रबिंदू; मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला मध्यरात्री येताहेत राजकीय नेते
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 12:18 PM2024-10-18T12:18:27+5:302024-10-18T12:19:12+5:30
लोकसभा निवडणुकीत ‘जरांगे फॅक्टर’ महत्त्वाचा ठरला. मराठवाड्यात सात जागांवर महायुतीचा पराभव झाला. याची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये म्हणून महायुतीच्या नेत्यांचे पाय अंतरवाली सराटीकडे वळत आहेत.
पवन पवार -
वडीगोद्री (जि.जालना) : विधानसभा निवडणूक जाहीर होताच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी राजकीय नेते आणि इच्छुकांची रांग लागली असून सरकारमधील मंत्री मध्यरात्री भेटी घेत असल्याने या भेटीमागील गूढ काय, याची उत्सुकता लागून आहे.
लोकसभा निवडणुकीत ‘जरांगे फॅक्टर’ महत्त्वाचा ठरला. मराठवाड्यात सात जागांवर महायुतीचा पराभव झाला. याची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये म्हणून महायुतीच्या नेत्यांचे पाय अंतरवाली सराटीकडे वळत आहेत. गेल्या १४ महिन्यापासून जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी लढा देत आहे. त्यांनी ६ उपोषणे केली. अखंड मराठा समाज त्यांच्या बाजूने एकवटला आहे. त्याची प्रचिती नारायण गडावरील दसरा मेळाव्यात आली.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न मिळाल्याने नेतेमंडळींविषयी मराठा समाजात मोठा रोष आहे. यामुळे जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यासाठी राजकीय नेतेमंडळी दिवसाची गर्दी आणि मीडियाला टाळून मध्यरात्री जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत.
दरम्यान, जरांगे पाटील यांनी गुरुवारी दिवसभरात समाजाकडून उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज केलेल्या १८०० वर इच्छुकांशी चर्चा केली. यात काही इच्छुकांनी निवडणूक लढविण्याचा, तर काहींनी सत्ताधाऱ्यांना पाडण्याचा आग्रह धरला. अंतिम निर्णय २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत घेऊ, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.
चार दिवसांत या नेत्यांनी घेतली जरांगे यांची भेट
आचारसंहिता लागल्यानंतर अंतरवाली सराटी येथे मध्यरात्री येऊन अनेक राजकीय नेते मंडळींनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. यात मंत्री उदय सामंत, एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री राजेश टोपे यांचा समावेश आहे.