अंतरवाली सराटी सरकारच्या जवळच गाव, म्हणून येथे उपोषण करतोय; ओबीसी आंदोलकांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 02:47 PM2024-09-19T14:47:22+5:302024-09-19T14:48:03+5:30
इथला आवाज सरकारपर्यंत लवकर जातो; ओबीसी आंदोलकांच्या बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : सरकारला अंतरवाली सराटी जवळच गाव वाटतं, सरकारच्या पायघड्या येथे लवकर पोहोचतात म्हणून आम्ही येथे येऊन उपोषण करीत आहोत. येथून निघालेला आवाज लवकर सरकारला ऐकू जातो असा टोला ओबीसी आंदोलक ॲड मंगेश ससाणे यांनी लगावला. त्यांनी आज दुपारी माध्यमांशी संवाद साधला.
अंतरवाली सराटीत ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे हे पाच सहकाऱ्या सोबत बेमुदत उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करु नये हैदराबाद गॅझेटसह सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करू नये या सह इतर मागण्यासाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे.
सरकारला सोयीचे व्हाव म्हणून येथे उपोषण
दरम्यान, मराठा आरक्षणाचे नेते मनोज पाटील यांचे आंदोलन येथे सुरू असताना ओबीसी आंदोलकांनी हीच जागा का निवडली अशी टीका सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलक मंगेश ससाणे म्हणाले की, अंतरवाली सराटीतून उठलेला आवाज सरकारपर्यंत लवकर पोहतो. सरकारला सोयीचं व्हावं यासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत. अंतरवाली सराटीच्या रस्त्यावर आमचे दोन उपोषण आहेत. सरकार आमच्याकडे ही येईल आमच्या व्यथा जाणून घेईल. मी कायद्याची लढाई लढणारा आहे. आम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या फ्रंटवर ओबीसीची लढाई लढतोय. ही लढाई लढली पाहिजे, असे आवाहनही ससाणे यांनी केले.