अंतरवाली सराटी दगडफेक: अंबड पोलिसांकडून तिघांना अटक; गावठी पिस्टल, काडतुसे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 12:43 PM2023-11-25T12:43:07+5:302023-11-25T12:46:06+5:30
तिन्ही आरोपींना दोन डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे
वडीगोद्री/अंबड: अंतरवाली सराटी येथे पोलिस व मराठा आंदोलक यांच्यात झालेला लाठीहल्ला व दगडफेकीच्या घटनेत पोलिसांनी ऋषिकेश बेदरे आणि तर दोघे अशा तिघांना अटक केली आहे. बेदरेकडून एक गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, एक साधा मोबाइल जप्त केला असून, ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व अंबड पोलिसांनी केली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात कलम ३/२५ भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंतरवाली सराटी येथे १ सप्टेंबर रोजी झालेल्या लाठीहल्ल्यात मनोज जरांगे पाटील यांच्या काही सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी व महसूल अधिकारी यांच्याशी हुज्जत घालून पोलिसांना जिवे ठार मारण्याचा कट रचणे, पोलिसांवर दगडफेक करून गंभीर जखमी करणे, पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करून खाजगी वाहन जाळणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे व संबंधित प्रकरणांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये ऋषिकेश बेदरे (रा. गेवराई, जि. बीड) याचे पहिले नाव आहे. त्याच्यावर कलम ३०७, ३३३, ३३२, ३५३, ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातीलच आरोपीचा तपास घेत असताना ऋषिकेश कैलास बेदरे व दोघांकडे २० हजार रुपये किमतीचे गावठी लोखंडी धातूचे पिस्टल, २०० रुपये किमतीचे ७.६५ एमएमचे दोन जिवंत काडतुसे, १ हजार रुपये किमतीचा काळ्या रंगाचा मोबाइल, असा मुद्देमाल मिळून आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व अंबड पोलिसांकडून करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींना न्यायालयीन कोठडी
तपासानंतर २४ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी चार संशयित आरोपींना बीड जिल्ह्यातील गेवराई येथून ताब्यात घेतले. यातील तिघांना अंबड येथील जिल्हा व अपर सत्र न्यायालयात आज सकाळी हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत सुनावली. तर एका आरोपीबद्दल ठोस पुरावे मिळाले नसल्यामुळे त्याला नातेवाईकाच्या हवाली करण्यात आले.
हा कुठला डाव ?
अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणात पोलिसांनी दोन महिन्यांनी तिघांना अटक केली आहे, या अटकेवर मनोज जरांगे पाटील यांनी आमच्या लोकांना अटक करण्याचा हा कुठला डाव ? असा सवाल केला आहे. 'सरकारने आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण अटक केली.अंतरावली सराटीत आमच्यावर हल्ला झाला. आम्ही कट रचला नव्हता' असे देखील जरांगे यांनी स्पष्ट केले.