जरांगेंनी प्यायलं पाणी, रात्रभर जागली अंतरवाली; उपोषण सुरूच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 01:13 PM2024-02-15T13:13:56+5:302024-02-15T13:17:44+5:30

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे अधिकच आक्रमक झाले असून आता मागे हटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे

Antarwali stayed up all night, Manoj Jaranges drunk water; But the fast will continue for maratha reservation | जरांगेंनी प्यायलं पाणी, रात्रभर जागली अंतरवाली; उपोषण सुरूच राहणार

जरांगेंनी प्यायलं पाणी, रात्रभर जागली अंतरवाली; उपोषण सुरूच राहणार

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून जरांगे यांची प्रकृती खालावलेली आहे. बुधवारी सकाळी त्यांच्या नाकातून रक्त आले. त्यांना मोठा अशक्तपणाही आला होता, तरीही त्यांनी पाणी पिण्यास उपचारासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणीस नकार दिला होता. मात्र, गेल्या ५ दिवसांपासून अन्न व पाण्याविना असल्याने डॉक्टरांनी त्यांना सलाईन घेण्याची विनंती केली होती. अखेर त्यांनी ती विनंती मान्य करत सलाईन घेतले. मात्र, मध्यरात्री त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेल्याने मराठा समाज बांधव, पत्रकार व डॉक्टरांनी केलेल्या विनंतीनंतर त्यांनी पाणी प्यायले.  

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे अधिकच आक्रमक झाले असून आता मागे हटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून प्रकृती खालावली आहे. त्यांच्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये समर्थकांनी रात्रभर जागून त्यांना साथ दिली. यावेळी, डॉक्टर व स्थानिक पत्रकारांच्या विनंतीनंतर व मराठा समाज बांधवांच्या आग्रहाखातर अखेर त्यांनी पाणी प्यायले. मात्र, त्यांचे उपोषण अद्यापही सुरूच आहे. दुसरीकडे सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अधिवेशन घेण्याची तयारी दर्शवली आहे.  

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालल्याने मराठा बांधव व महिला या उपोषणस्थळी दाखल झाले आहेत. सर्वांनीच त्यांना पाणी व उपचार घेण्याची विनवणी केली होती. मात्र, त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे उपस्थित महिला व बांधव भावूक झाल्याचं दिसून आलं. अंतरवाली सराटीत समाजबांधवांचा ओघ वाढत चालला असून ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. तसेच, जरांगे यांच्या प्रकृतीबद्दल चिंताही व्यक्त केली जात आहे.

२० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याच्या निर्णयावर अखेर बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब झाले असून, २० फेब्रुवारीला हे अधिवेशन पार पडणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. सगेसोयरे यासंदर्भातील अधिसूचनेलाही अधिवेशनात कायद्याचे स्वरूप येण्याची शक्यता आहे. मराठा-कुणबी आरक्षणात सगेसायऱ्यांच्या व्याख्येसंदर्भातील मसुद्याच्या अंमलबजावणीबाबत संभ्रम असल्यामुळे मनोज जरांगे-पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे राज्य सरकारविरोधात मराठा आंदोलकांचा रोष वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता राज्य सरकारकडून २० फेब्रुवारीला विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.  

काय म्हणाले जरांगे ?

माझा जीव गेल्यावर महाराष्ट्रात सरकार राहील का ? महाराष्ट्रात दुसरी श्रीलंका दिसेल, असा इशारा देत सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आपण मागे हटणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे-पाटील यांनी घेतली आहे. अध्यादेशाची अंमलबजावणी करणे सरकारची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकमेकांवर ढकलत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही देणे-घेणे नाही. ते भुजबळांना बळ देतायत. सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी घेणार नाही. माझा जीव गेल्यावर सरकार महाराष्ट्रात राहील का? आमदार, खासदार, मंत्र्यांच्या घरी लोकं जातील. पंतप्रधानांची एकही सभा महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला.
 

Read in English

Web Title: Antarwali stayed up all night, Manoj Jaranges drunk water; But the fast will continue for maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.