'एटीएम' हरवल्याची तक्रारीसाठी 'एनी डेस्क' डाउनलोड केले; काहीवेळात खात्यातून २ लाख लंपास झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 07:15 PM2022-02-16T19:15:00+5:302022-02-16T19:15:38+5:30
ऑनलाईन शोधलेल्या कस्टमर केअर क्रमांकावर संपर्क करणे महागात पडले.
भोकरदन ( जालना ) : एटीएम कार्ड हरवल्याची तक्रार करण्यासाठी ऑनलाईन शोधलेल्या कस्टमर केअर क्रमांकावर संपर्क करणे एकाला चांगलेच महागात पडले आहे. तक्रार करण्यासाठी एनी डेस्क अप्लिकेशन डाउनलोड करायला लावून सायबर भामट्यांनी तब्बल दोन लाख रुपये ऑनलाईन लंपास केल्याचे उघडकीस आल्याने तक्रारदाराला घाम फुटला आहे.
मनापूर येथील माजी सरपंच योगेश लक्ष्मण दळवी यांचे ११ फेब्रुवारी रोजी एटीएम कार्ड गहाळ झाले. घरी येऊन गूगल सर्च करत त्यांनी एका कस्टमर केअर नंबरवर संपर्क केला. आवाज व्यवस्थित येत नसल्याने दळवी यांनी कॉल बंद केला. तेव्हा एका अनोळखी क्रमांकावरून त्यांना फोन आला. समोरच्या व्यक्तीने दळवी यांना एनी डेस्क हे अप्लिकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड करायला सांगितले. नाव व मोबाईल क्रमांक त्यात टाकले असता दुपारी २.२० वाजेच्या खात्यातून ५० हजार रुपये काढल्याचा मेसेज दळवी यांना आला.
त्यानंतर दळवी यांनी पुन्हा त्याच कस्टमर केअर क्रमांकावर संपर्क केला. तेव्हा पुन्हा दुसऱ्या नंबरवरून कॉल आला आणि खाते बंद करतो असे सांगण्यात आले. यानंतर सोमवारी १४ फेब्रुवारीस दळवी यांनी बँक स्टेटमेंट तपासले असता ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान तब्बल २ लाख रुपये खात्यातून काढण्यात आल्याचे समजले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आल्यानंतर योगेश दळवी यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. जालना सायबर सेल पुढील तपास करत आहे.