कुस्ती कितीही खेळवा, बाजी मी मारणार- दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:56 AM2019-01-11T00:56:41+5:302019-01-11T00:57:20+5:30
कुस्ती स्पर्धा कितीही झाल्या तरी त्यात शेवटचे बक्षीस हे आपणच जिंकणार, असा टोला खा. दानवेंनी लगावल्याने सभागृहात एकच हशा पिकाला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहराच्या विकासासाठी आपण गेल्या चार वर्षात कोट्यवधी रूपये आणले आहेत, आणखी निधी हवा असल्यास तो आपण खेचून आणू. कुस्ती स्पर्धा कितीही झाल्या तरी त्यात शेवटचे बक्षीस हे आपणच जिंकणार, असा टोला खा. दानवेंनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे नाव न घेता लगावल्याने सभागृहात एकच हशा पिकाला. रामेश्वर साखर कारखान्याचे जेंव्हा नाव घेता तेव्हा रामनगर कारखान्याचे काय त्याबद्दल मात्र ब्र बोलले जात नाही. असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केले. ते गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते.
शहरातील प्रभाग क्रमांक २२, २३ मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव खा. दानवे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, उपनराध्यक्ष राजेश राऊत, भाजपचे उपाध्यक्ष भास्कर दानवे, नगरसेवक विष्णू पाचफुले, प्रशांत गाढे, सिध्दीविनायक मुळे, संजय देठे, नगरसेविका संध्या देठे यांच्यासह गुणवंत विद्यार्थी, पालकांची यावेळी उपस्थिती होती.
आपले शहर कोणत्याच बाबतीत मागे नाही, गुणवत्ता आहे, स्टील उद्योग आणि बियाणांचे हब म्हणून आपल्या शहराची ओळख दिल्लीपर्यंत आहे. मात्र शहरात म्हणावा तसा विकास झालेला नव्हता. शहरात, पाणी नाही, लाईट नाही, रस्ते नीट नाही. शहराच्या विकासासाठी चांगले नागरिक आपले तोंड उघडत नसल्याने शहराचा विकास खुंटत चालला असल्याची खंत दानवे यांनी व्यक्त केली. गेल्या चार वर्षात राज्य शासनाकडून कोट्यवधी निधी सिमेंट रस्त्यासाठी , पथदिव्यांसाठी आणल्याने शहरात उजेड तरी दिसत आहे. नाही तर आठवर्षापासून शहर अंधारात होते. याकडे सत्ताधाऱ्यांनी जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा संताप दानवे यांनी व्यक्त केला. मला सेटलमेंटचे राजकारण जमत नाही. सेटेलमेंटच्या राजकारणामुळे शहराचे वाटोळे केले आहे. राज्यातील अनेक शहरांनी कात टाकली आहे.
मात्र शहराला जुनी ओळख असतांना आपण मागे का ... यासाठी जिम्मेदार असलेल्यांना जनतेने जाब विचारण्याची गरज असल्याचे यावेळी दानवे म्हणाले. केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर शहराच्या विकासाठी जे - जे करता येईल ते केले, ड्रायपोर्ट, सिडकोचा प्रकल्प, आयसीटी महाविद्यालय लोखंडीपुलासाठी निधी, शहराच सुसज्ज वाचनालय बनविण्यात येणार असल्याचे दानवे म्हणाले. पत्रिकेवर नाव न टाकल्याने काही फरक पडत नाही. पहिलवानाचा गड हा कुस्तीचे मैदान असल्याचा टोलाही दानवे यांनी राज्यमंत्री खोतकर यांचे नाव न घेता लावला. पैशाची कमी नाही. कामे करुन घ्या, असे दानवे म्हणाले.