साडेपाच कोटींच्या चुराड्यानंतरही जिल्हा क्रीडा संकुलाला गायरान जमिनीचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:29 AM2021-08-29T04:29:30+5:302021-08-29T04:29:30+5:30
जालना : शहरातील जिल्हा क्रीडा संकुलावरील चारशे मीटर रनिंग ट्रॅकसह विविध क्रीडांगण निर्मितीसाठी साडेपाच कोटी रुपये निधीचा चुराडा करण्यात ...
जालना : शहरातील जिल्हा क्रीडा संकुलावरील चारशे मीटर रनिंग ट्रॅकसह विविध क्रीडांगण निर्मितीसाठी साडेपाच कोटी रुपये निधीचा चुराडा करण्यात आला; परंतु देखभाल- दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने आज जिल्हा क्रीडा संकुलाला गायरान जमिनीचे स्वरूप आले आहे. केवळ लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरासह जिल्ह्यातील दर्जेदार खेळाडू सोयी-सुविधांपासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे.
जिल्हा क्रीडा संकुलावरील विविध क्रीडांगणांसह मैदाने तयार करण्यासाठी शासनाकडून जवळपास आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यातील प्राप्त साडेपाच कोटी रुपये खर्च करून रनिंग ट्रॅक, वसतिगृह, विविध क्रीडांगणे, व्यायामशाळा, संरक्षक भिंत आदी विकास कामे येथे करण्यात आली आहेत. त्यातही काही विकास कामे अर्धवट अवस्थेत आहेत; परंतु या क्रीडा संकुलाचे आजचे स्वरूप पाहता खर्च केलेला साडेपाच कोटी रुपयांचा खर्च मातीत गेल्याचे दिसून येते. थोडाही पाऊस झाला की रनिंग ट्रॅकवर पाय ठेवता येत नाही. त्यात मैदानाच्या आतील बाजूला गाजर गवत मोठ्या प्रमाणात उगवले आहे. संरक्षक भिंतीची दुरवस्था झाली असून, इतर मैदानांची अवस्था त्यापेक्षाही बिकट झाली आहे. जिल्हा क्रीडा संकुलाचे रूपडे पालटण्यासाठी आणि खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.
चौकट
जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहण
जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयालाच रिक्त पदांचे ग्रहण लागले असून, सध्या प्रभारीवर कामकाज सुरू आहे. जिल्हा क्रीडाधिकारी, दोन तालुका क्रीडाधिकारी, कार्यालयातील दोन क्रीडाधिकारी, प्रशिक्षक, कनिष्ठ लिपिक आणि सेवक ही पदे रिक्त आहेत. ज्या कार्यालयालाच रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे, त्या कार्यालयांतर्गत सुरू असलेली कामे वेळेत कशी पूर्ण होतील, असाच प्रश्न निर्माण होत आहे.
साडेबारा कोटी रुपयांची कामे प्रस्तावित
जिल्हा क्रीडा संकुलावरील कामांसाठी शासनाकडून जवळपास दोन ते अडीच कोटी रुपयांचा निधी प्राप्त आहे. त्यात गतवर्षी शासनाने जालन्यासाठी विशेष बाब म्हणून दहा कोटी रुपये मंजूर केले आहेत. पूर्वीचे अडीच आणि नव्याने मिळणारे दहा कोटी अशा एकूण साडेबारा कोटी रुपयांच्या कामांचा आराखडा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे; परंतु यापूर्वी केलेली कामे आणि त्याची आजची अवस्था पाहता होणारी कामे कशी होणार, हेही कोडेच आहे.
वसतिगृहात पोलीस ठाणे
जिल्हा क्रीडा संकुलावर खेळाडूंसाठी सुसज्ज वसतिगृह बांधण्याचे नियोजन होते; परंतु कामे अर्धवट राहिल्याने त्याचे हस्तांतरण झाले नसल्याने त्याचा वापर केला जात नसल्याचे क्रीडा कार्यालयाकडून सांगण्यात येते. बसून असलेली ही इमारत कदीम ठाण्याला डिसेंबर २०२१ पर्यंत वापरण्यास देण्यात आली आहे. खेळाडूंसाठी नाही किमान पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी तरी ही इमारत वापरात येत असल्याचे दिसते.
तालुका क्रीडा संकुलांच्या कामांना कासव गती
परतूर व मंठा येथील तालुका क्रीडा संकुलासाठी प्रत्येकी तब्बल पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येकी अडीच कोटींचा निधी मिळाला. मंठ्यात जलतरण तलाव, २०० मीटर रनिंग ट्रॅक व इतर कामे सुरू आहेत. तर परतूर येथे मल्टीपर्पज हॉलचे काम सुरू आहे. उर्वरित कामांसाठी प्रत्येकी जवळपास पाच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे; परंतु निधी अद्याप अप्राप्त आहे.