कोतवाल भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु; १० सप्टेंबर रोजी होणार परीक्षा
By रवी माताडे | Published: August 8, 2023 01:44 PM2023-08-08T13:44:39+5:302023-08-08T13:46:15+5:30
आजपासून अर्ज दाखल प्रक्रिया सुरू, २३ ऑगस्ट शेवटची मुदत
मंठा : तालुक्यात कोतवालांच्या ११ जागा भरण्यासाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना २३ ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करता येतील. अर्ज केलेल्यांपैकी पात्र उमेदवारांची १० सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. महसूल विभागातील 27 तलाठी सज्जासाठी 27 कोतवालांच्या जागा मंजूर आहेत. यातील 13 ठिकाणी कोतवाल कार्यरत असून 14 जागा रिक्त आहेत. यापैकी 11 जागा भरण्यासाठी हि भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
या भरती प्रक्रियेसाठी 10 सप्टेंबरला शहरातील विविध केंद्रावर लेखी स्वरूपात परीक्षा घेण्यात येणार आहे. या पदासाठी वयोमर्यादा किमान 18 तर कमाल 40 वर्षे आहे, तर शिक्षणाची किमान चौथी पासची अट आहे. वेळेत अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांचाच विचार केला जाईल., तसेच कोतवाल पदाच्या भरतीसाठी तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही., असे निवड समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी परतूर यांनी कळवले आहे.
कोतवालांना मिळणार १५ हजार रुपये मानधन
या भरतीसाठी अर्जाची किंमत ५० रुपये असून, खुल्या वर्गातील उमेदवारांना ५०० रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांना ४०० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल. कोतवाल म्हणून निवड झाल्यास त्यांना १५ हजार रुपये प्रति महिना मानधन मिळते.
काय आहे जबाबदाऱ्या
महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामात मदत करणे. नोटीस तामिल करणे, पंचनाम्यासाठी मदत करणे, टपालाची देवाण-घेवाण करणे आदी जबाबदाऱ्या कोतवालाला पार पाडाव्या लागतात.