चिटणीसपदी सपकाळ यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:21 AM2021-06-24T04:21:06+5:302021-06-24T04:21:06+5:30
देवी रोडची दुरवस्था मंठा : संपूर्ण तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या रेणुका देवी मंदिराच्या रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. ...
देवी रोडची दुरवस्था
मंठा : संपूर्ण तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या रेणुका देवी मंदिराच्या रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. शहरापासून तहसील कार्यालय पर्यंतच्या रस्त्याची अक्षरश : चाळणी झाली असून, सर्वत्र मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे भक्तांसह नागरिकांची मोठी कुचंबणा होत आहे.
धनगर आरक्षणाला नेते जबाबदार- देंडगे
जालना : राज्यातील धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणासंदर्भात गेल्या पन्नास वर्षापासून लढा चालू आहे. परंतु, धनगर समाजातील नेते हे स्वार्थी आणि मतलबी झालेले आहेत. त्यामुळे राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. आता समाजाच्या नेत्यांना धडा शिकवणार असल्याचे धनगर समाज संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष सुभाष देंडगे यांनी सांगितले.
चिखली परिसरात दुबार पेरणीचे संकट
बदनापूर : बदनापूर तालुक्यातील चिखली परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतेत आहेत. काही शेतकऱ्यांनी कपाशी, तूर, मूग, मका, सोयाबीन, उडीद, मटकी, भुईमूग आदींची लागवड केली. परंतु लागवड करून पंधरा दिवस झाले. पावसाने दडी मारल्याने अंकुरावर तांब्याने पाणी टाकण्याची वेळ आली आहे. चिखली परिसरातील चनेगाव, धामणगाव, वंजारवाडीतील शेतकरी हैराण आहे.
गुंज येथे रस्त्यावर उभी केलेली दुचाकी लंपास
घनसावंगी : घनसावंगी तालुक्यातील अंबड- परभणी रोडवरील विरेगाव तांडा येथील शेतकरी महेश नानासाहेब निचळ यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी शेतासमोरील रस्त्यावरून लंपास केली. विरेगाव तांडा शिवारात दुचाकी घेऊन ते शेतातील रोडच्या बाजूला लावून शेतीकामासाठी ते गेले होते. शेतातील आपले काम आटोपून आले असता दुचाकी दिसून आली नाही.
वरूड बुद्रूक येथे वृक्षारोपण
वरूड बुद्रूक : भोकरदन तालुक्यातील वरुड बुद्रूक येथील भारतमाता कनिष्ठ महाविद्यालय परिसर तसेच भारज बुद्रूक, रास्तळ, कोनड, वानखेडा येेथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सदस्य नाना बोडखे, सरपंच संतोष जाधव, मंगेश गव्हाड, एकनाथ परीहार, काशिनाथ परीहार, संदीप लोखंडे, अनिल बारगळ, गजानन गवते, रवी काकडे, कैलास फुसे, गजानन सपकाळ आदींची उपस्थिती होती.
हसनाबाद येथे एक हजार झाडांची लागवड
भोकरदन : तालुक्यातील हसनाबाद येथे ग्राम संसद कार्यालयामार्फत नवीन एक हजार झाडे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा परिसर तसेच शासकीय विश्रामगृहाच्या आवारात लावण्यात आली. या प्रसंगी गटविकास अधिकारी उदयसिंग राजपूत, सरपंच सुरेश काकाजी, उपसरपंच कृष्णा खडेकर, ग्रामविकास अधिकारी गणेश इरतकर, देवलाल आकोदे, रईस कादरी, विजय ढाकेफळे, मुकेश पवार आदी उपस्थित होते.
भाले विद्यालयात पालक मेळावा
अंबड : येथील कै. दत्ताजी भाले प्राथमिक विद्यालयात इयत्ता पहिली ते सातवी विद्यार्थ्यांचा पालकांचा मेळावा घेण्यात आला. मुख्याध्यापक विष्णू सोनवणे यांनी सध्याच्या परिस्थितीत आपले वर्गनिहाय सुरु असलेल्या ऑनलाईन क्लासेस तसेच शाळेचे शैक्षणिक उपक्रम, शिक्षक - पालक संवादाची आवश्यकता, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी करत असलेले उपक्रम याबाबत माहिती दिली.